होळीनंतर कडाक्याच्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून यंदा अनेक ठिकाणी मार्च महिन्यातच पारा चाळीच्या पार गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून वीजेची मागणीही वाढली आहे. अशा परिस्थितीत आता देशभरातील बत्ती दोन दिवस गुल होणार असल्याचे सांगितले जात आहे. वीज उद्योगाचे खासगीकरण, विभाजन आणि फ्रॅन्चाईसी धोरणाविरोधात देशातील १५ लाख कामगार, अभियंते आणि अधिकारी दोन दिवसाच्या संपावर जाणार आहेत.
(हेही वाचा – ई-चलन वसुली ठरतंय पोलिसांच्या डोक्याला ताप!)
मिळालेल्या माहितीनुसार, या देशव्यापी संपात राज्यातील वीज कंपन्यांमधील ८६ हजार कामगार, अभियंते आणि कंत्राटी कर्मचारी सहभागी होतील. दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणांच्याविरोधात देशभरातील विविध कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी येत्या २८ आणि २९ मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
या धोरणाविरोधात राज्यातील ३९ संघटना एकवटल्या
देशभरातील विविध ठिकाणी वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव आहे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी वीज कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. केंद्र सरकारने विद्युत बिल २०२१ चा मसुदा तयार केला आहे. त्या सुधारित मसुद्याला देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, शेतकरी संघटनांनी, ग्राहकांच्या संस्थांनी, वीज उद्योगांतील कर्मचारी व इंजिनिअर्सच्या सर्व संघटनांनी आणि ४५० स्टेक होल्डर्सनी विरोध केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात राज्यातील वीज कंपन्यांमधील ३९ संघटना एकत्रित आल्या आहेत.
कोण होणार सहभागी?
दिल्लीत झालेल्या बैठकीत विविध कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, हिंद मजदूर सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर, ट्रेड युनियन कॉर्डिनेशन सेंटर, सेल्फ एम्प्लॉयड वूमेन्स असोसिएशन, ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन, लेबर प्रोग्रेसिव फेडरेशन आणि युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस या संघटनांनी सहभाग घेतला.
Join Our WhatsApp Community