उमर खालिदला दणका! ‘या’प्रकरणी न्यायालयानं फेटाळला जामीन अर्ज

142

दिल्लीतील दंगलीप्रकरणी तुरुंगात असलेला जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला न्यायालयाने दणका दिला असून त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी उमर खालिदवर दंगलीचा कट रचल्याप्रकरणी यूपीपीए अंतर्गत अटक केली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी उमर खालिदला मुख्य सूत्रधार म्हणून अटक केली होती. उमर खालिदच्या जामीन याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली होती. जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने गुरुवारपर्यंत टाळला होता. त्यानंतर न्यायालयाने गुरूवारी निकाल सुनावला. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश अमिताभ रावत यांनी या जामीन अर्जावर निकाल दिल्याचे समोर आले आहे.

उमर खालिदवर कोणते आरोप झाले? 

मिळालेल्या माहितीनुसार, उमर खालिद अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपचा भाग असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात सांगितले होते. ज्यांच्या माध्यमातून हिंसाचाराचा कट रचला गेला. उमरने लोकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केले होते. इतकेच नाही तर जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत आले होते, तेव्हा उमर यांनी लोकांना रस्त्यावर येण्यास सांगितले होते. जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळू शकेल. उमर खालिदच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करताना सर्व आरोप खोटे आणि बनावट असल्याचे सांगण्यात आले. उमरच्या वकिलाने न्यायालयात सांगितले होते की, कोणत्याही मुद्द्यावर आवाज उठवणे हा गुन्हा नाही. उमर खालिद हा व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये होता. मात्र तो त्या गटांमध्ये सक्रिय नव्हता.

(हेही वाचा – अधिवेशन सोडून शिवसेना खासदार गेले कुणीकडे?)

उमर खालिदसह अन्य लोकांविरोधात फेब्रुवारी २०२० रोजी दिल्लीत दंगल घडवल्याचा आरोप होता. या झालेल्या हिंसाचारात ५३ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. उमर व इतरांनी या दंगलीचा कट आखल्याचा ठपका त्यांच्याविरोधात ठेवण्यात आल्याने दहशतवादविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इकतेच नाही तर या दंगलीच्या माध्यमातून देशात अराजकता फैलावण्याचा आरोपदेखील उमरवर करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.