भारतीय संस्कृतीत विवाह पवित्र मानला जातो. तसेच, विवाह हे एक पवित्र नाते असून, त्याची शुद्धता राखणे आवश्यक असल्याचं म्हणत, उच्च न्यायालयाने आपल्या जोडीदारावर चारित्र्यहीनतेचा आरोप करणा-या पत्नीला सुनावले आहे. पतीने महिलेच्या क्रूरतेवरुन कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना, दिल्ली उच्च न्यायालयाने हे मत नोंदवलं आहे.
उच्च न्यायालयात दिले आव्हान
2014 साली लग्न झाल्यानंतरच दोघांचे संबंध बिघडले होते. 2017 मध्ये पतीने आपल्या पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज केला, जो 2019 मध्ये मंजूर झाला. कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला त्या महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले.
आरोप सिद्ध झाले नाहीत
या महिलेने पतीवर गंभीर आरोप केले होते. तसेच, सास-यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. पण दोघांवरही केलेले आरोप सुनावणी दरम्यान, न्यायालयात सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे लग्नासारख्या पवित्र नात्यावर असे खोटे आरोप लावले जाऊ नयेत, असे मत न्यायमूर्तींनी नोंदवले आहे.
( हेही वाचा: अधिवेशन सोडून शिवसेना खासदार गेले कुणीकडे? )
न्यायालयाने नोंदवलं मत
यावर निर्णय देताना, उच्च न्यायालय म्हणालं की, पती आणि त्याच्या वडिलांवर बिनबुडाचे आरोप म्हणजे त्यांच्या चारित्र्याची हत्या आहे. पती पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप हे त्याचे चारित्र्य, दर्जा, प्रतिष्ठा आणि आरोग्यावर गंभीर आघात असल्याचे सांगण्यात आले. या अशा आरोपांमुळे मानसिक आघात आणि त्रास होतात ही क्रूरता आहे, असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे.
Join Our WhatsApp Community