गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री का झाले नाराज?

117

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब टाकल्यावर महाविकास आघाडीची अडचण झाली होती. त्यावर सलग तीन दिवस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उत्तर देता आले नाही. त्यानंतर गृहमंत्र्यांनी ज्याप्रमाणे उत्तर दिले ते अजिबात आक्रमक नव्हते, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांकडून समजते.

गृहखात्याच्या कारभारावर असंतुष्ट 

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात खंबीरपणे प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होते. परंतु दिलीप वळसे-पाटील यांनी सावध पवित्रा घेतला. त्यांना ठामपणे उत्तर देता आले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशी नाराजी मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी एकूणच गृहखात्याच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची बाजू सावरून घेतल्याचे समजते.

(हेही वाचा अधिवेशन सोडून शिवसेना खासदार गेले कुणीकडे?)

काय आहे प्रकरण?

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील पेनड्राईव्ह बॉम्बमुळे महाविकास आघाडीचे नेते चांगलेच गांगरून गेले होते. यामध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या माध्यमातून भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासंबंधीचे संभाषण होते. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील हे संभाषण उघड झाल्याने महाविकास आघाडीची चांगलीच गोची झाली होती. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि प्रवीण चव्हाण यांनी ऑडिओ-व्हिडिओ क्लीपच्या सत्यतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु, थेट विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात कॅमेरा बसवून स्टिंग ऑपरेशन झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे लागल्या होत्या. परंतु दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात आपल्या नेहमीच्या मवाळ स्वभावाला साजेशी अशी सावध भूमिका घेत भाषण केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एकही आरोप खोडून काढला नाही. आम्ही या सगळ्याची सीआयडीमार्फत चौकशी करू, असे सांगत दिलीप वळसे पाटील यांनी आपले भाषण आटोपते घेतले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.