मालमत्ता कर वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला; अधिकारी जखमी

129

मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाच्या माध्यमातून मालमत्ता कर वसूल करण्यात येत असून अपेक्षित कर वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रत्यक्ष भेटी देत कराची रक्कम भरण्यास भाग पाडली जात आहे. बुधवारी फोर्ट परिसरातील एका मालमत्तेवर जप्ती अटकावणी कारवाईसाठी फोर्ट परिसरातील मोदी स्ट्रीट येथील कीर्ती महल इमारतीत गेले असता, मालमत्ता धारकाकडून महापालिकेच्या पथकावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अधीक्षक दशरथ घरवाडे हे जखमी झाले असून यांच्या उजव्या डोळयाजवळ जबर मार लागला. मात्र, या प्रकरणी मालमत्ता धारक व हल्लेखोर यांच्या विरोधात पोलीस तक्रार घ्यायला तयार नव्हते. परंतु विभागाचे सर्व निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडल्यावर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

( हेही वाचा : मराठी पाट्या : राज्य सरकारला पडला देवदेवतांचा विसर! )

बुधवारी २३ मार्च रोजी दुपारी तीन वाजता ए-विभागातील १ अधिक्षक, २ उपअधीक्षक, तीन निरिक्षक आणि शिपाई हे फोर्ट येथील एका मालमत्तेची थकीत वसूल करण्यासाठी कलम 202, 203, 204 अन्वये जप्ती अटकावणी कारवाई साठी गेले होते. यावेळी ही प्रक्रिया सुरू असतानाच तेथील तिघांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या पथकातील अधिकाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर तिथे पोलीस हजर झाले. तोपर्यंतच मारहाण करणाऱ्या तिघांपैकी एकजण पसार झाला होता. त्यामुळे मुख्य एकाला पकडून माता रमाबाई अंबेडकर पोलीस स्थानकात आणले गेले. या झटापटीत अधीक्षक दशरथ घरवाडे यांच्या उजव्या डोळयाजवळ जबर मार लागला.

BMC 11

संबंधित व्यक्तीला अटक

पोलिसांनी ताब्यात घेतलेली व्यक्ती ही मालमत्ता कर भरण्याचे दायित्व असणारी होती. त्याने मग वकिलांची फौज जमा करून दबाव तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस त्याच्याविरोधात तक्रार तथा गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नव्हते. त्यानंतर ही बातमी कारनिर्धारण व संकलन निरीक्षकांपर्यत पोहोचली आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठरा निरिक्षक, २ उपअधीक्षक, सहायक करनिर्धारण व संकलक शिपाई इ. मंडळींचा मोर्चा पोलीस स्थानकात जमा झाला.

या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकी पाहून अखेर पोलिसांनी सहकार्य करायची तयारी दर्शवली. त्यानंतर उपअधीक्षकांची वैद्यकिय तपासणी, जाबजबाब, एफआयआर नोंदवला गेला. त्यानंतर मध्य रात्री साडेबारा वाजता संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली.

कराची रक्कम भरलेली नाही

ही मालमत्ता अश्विन कुमार शाह यांच्या नावावर असून मागील दहा ते बारा वर्षांपासून त्यांनी कराची रक्कम भरलेली नाही. ही थकीत रक्कम ४६ लाख रुपये आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी नोटीस पाठवून त्यांच्या जप्तीची अटकावणी करण्यात आली होती. त्यानुसार पुढील नोटीस पाठवून त्यांच्या वाहनांना क्लम्प लावण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांच्या चालकांनी हटकले. त्यावेळी ही कारवाई नियमानुसार होत असल्याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी हुज्जत घालत मारहाण करण्यास सुरुवात केली असे दशरथ घरवाडे यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलतांना सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.