संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू झाल्यावर त्यांची नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. गेले अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाबाबत अधिवेशन कालावधीमध्ये शासनाची भूमिका सभागृहात मांडण्याबाबतच्या सूचना दोन्ही सभागृहातील सभापती व अध्यक्ष यांनी दिल्या होत्या. याबाबत परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहात निवेदन केले.
कर्मचाऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका
संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा राग नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच ३१ मार्च २०२२ पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य सरकारने वेळोवेळी बैठका घेऊन संपाची दखल घेत कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता १२ टक्क्यावरून २८ टक्के करण्यात आला, घरभाडे भत्ता ७ टक्के, १४ टक्के, २१ टक्के वरुन ८ टक्के, १६ टक्के आणि २४ टक्के टक्के करण्यात आला, तसेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सेवा कालावधीनुसार रुपये ५०००, रुपये ४००० व रुपये २५०० अशी वाढ करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये साधारणत: रुपये ७००० ते ९००० रुपये वाढ झाली आहे व महामंडळावर दरमहा रुपये ६३ कोटीपेक्षा जादा भार पडला आहे. ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास आहे. त्यांच्या नोकरीची हमी आणि त्यांचा पगार महिन्याच्या १० तारखेच्या आत देण्याची राज्य सरकारने ग्वाही घेतली आहे. संप काळात एसटी महामंडळाला कोणतेही उत्पनाचे साधन नसताना कर्मचाऱ्यांना २५०० ते ५००० रुपये दिवाळी भेट म्हणून दिले. यामुळे महामंडळावर सुमारे २४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला. कृती समिती संघटनेने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या असतानाही कर्मचारी संपावर ठाम राहिले. हे कामगार वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच कामगारांच्या भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका, असेही परिवहन मंत्री म्हणाले.
(हेही वाचा ED ने केलेल्या कारवाईनंतर प्रताप सरनाईकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…)
Join Our WhatsApp Community