भूतप्रेत पकडणाऱ्याला पोलिसांनी पकडले! भूतप्रेताच्या नावाखाली नरबळी देण्याचा प्रयत्न

149

‘घोस्ट डिटेक्टर मशीन’ आणि कॅमेराच्या साह्याने भूतप्रेत पकडण्याचा दावा करून भूतप्रेत पकडण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या एका भोंदूसह तिघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. या तिघांनी एका मुलीचा नरबळी देण्याच्या नावाखाली तिचा लैगिंग छळ केल्याचा गुन्हा ठाण्याच्या चितळसर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या तिघांजवळून प्राणी पक्षाचे अवयव, तसेच विविध प्रकारचे कॅमेरे, घोस्ट डिटेक्टर मशीन, तंत्रमंत्र विद्येची पुस्तके आणि जादूटोण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.

( हेही वाचा : व्हाया सीरिया ते जम्मू-काश्मीर असंं होत होतं टेरर फंडिंग! )

गुन्हा दाखल

कुलदीप प्रदीप निकम (रा.पोखरण रोड नंबर ठाणे), किशोर देवीदास नवले, (रा. विक्रोळी, रामवाडी), स्नेहा नाथा शिंदे, (रा.पोखरण रोड नंबर 2, औसवाल पार्क) अशी अटक करण्याचे आलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांविरोधात चितळसर पोलिस ठाण्यात भोंदूबाबा आणि लहान मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुलदीप निकमने नरबळी देण्यासाठी एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कुलदीप निकम याने दत्त प्रबोधिनी नावाची संस्था आणि पॅरानॉर्मल रेस्क्युअर सोसायटी नावाचे युट्यूब चॅनल उघडले आहे. त्यात भूतप्रेताचा शोध घेउन स्वतः तंत्रमंत्राद्वारे त्यातून मुक्ती मिळवून देतो, असा अपप्रचार करून तो अनेक लोकांची फसवणूक करत होता. कुलदीप निकम याने भूतप्रेत पकडत असल्याचे शेकडो व्हिडीओ तयार करून ते युट्युब चॅनेलवर टाकले असून त्यांच्या व्हिडीओला हजारो फॉलोअर्स आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कुलदीपच्या घराच्या झडतीत पोलिसांनी महागडे लॅपटॉप, मोबाइल फोन, ड्रोन कॅमेरे, नाइट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे, एक घोस्ट डिटेक्टर मशीन, पैसे मोजण्याचे मशीन, प्राण्यांचे दात, सापाची कातडी, कावळ्याची पंख, होम हवनचे साहित्य, त्रिशूळ, चिमटा व आणि तंत्रविद्येची पुस्तके असा अंदाजे ६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जादूटोण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळले

भोंदूबाबाचा साथीदार असलेला अटक आरोपी किशोर देवीदास नवले याच्या बदलापूर येथील घरात दोन वाघांचे कातडे, हॅलोजन लाइट व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तर कुलदीप निकमच्या कल्याणमधील ऑफिसची झडती घेतली असता त्यात लॅपटॉप, हार्ड डिस्क, कावळ्याचे पंख, काळ्या बाहुल्या, रुद्राक्षाच्या माळा, हवनकुंडाचे साहित्य, सफेद कवड्या, असे जादूटोण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. चितळसर पोलीस ठाणे येथे या तिघांवर गुन्हा महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळा जादु नियम २०१३ चे कलम ३ सह भा. द. वि. कलम ३४२, ५०४, ५०६ (२) ३२४, ३४ सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १२ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.