महाविकास आघाडीला घरचा आहेर!

187

माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात नोटीस बजावली असून 6 आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. नसीम खान यांनी मुख्यमंत्री आणि दिलीप लांडे यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्या बाजूने प्रचार केल्याचा आरोप नसीम खान यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे नसीम खान यांचा शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्याकडून 409 मतांनी पराभव झाला होता.

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नसीम खान यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेत उच्च न्यायालयातील याचिका एकतर्फी आणि अन्यायकारकपणे फेटाळण्यात आल्याचा आरोप केला आहे.

आचारसंहितेचा भंग?

रविवारी नसीम खान यांनी मुंबईत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एसके कौल आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेस यांच्या खंडपीठात त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. नसीम खान यांनी सांगितले की 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा 20 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस होता. त्यादिवशी निवडणूक प्रचाराची मुदत संपल्यानंतरही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांनी त्यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्यासह त्यांच्या मतदारसंघात प्रचार केला. 21  तारखेला मतदान होणार होते. इतकंच नाही, तर निवडणूक प्रचारात त्यांच्याविरोधात एक खोटा व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला होता.

( हेही वाचा: पी.व्ही.सिंधूने जिंकले स्विस ओपन विजेतेपद! )

निवडणुकीत प्रतिस्पर्धी होते

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते, मात्र निवडणुकीनंतर शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.