यंदा दहावी बारावीचा निकाल रखडण्याची शक्यता आहे, कारण राज्यातील कायम अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी बोर्डाच्या परीक्षेचे पेपर तपासण्यास नकार दिला आहे. आतपर्यंत झालेल्या पेपरच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना विभागीय मंडळात पडून आहेत. त्यामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल रखडण्याची शक्यता आहे. विनाअनुदानीत शाळांमधील तब्बल ३० हजार शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
समितीने दिला होता इशारा
दहावी- बारावीच्या परीक्षा सुरु होण्यापूर्वीच शाळांना शंभर टक्के अनुदान देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने सरकारला निवेदन दिले होते. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास दहावी बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही समितीने पत्रकार परिषदेत दिला होता.
( हेही वाचा: मातोश्री आणि डायरी यावर राऊत म्हणतात…)
तोपर्यंत आंदोलन सुरुच
बोर्डाकडून शिक्षकांना उत्तरपत्रिकेचे गठ्ठे पाठविण्यात येत आहेत. मात्र, विनाअनुदानित शिक्षकांकडून ते गठ्ठे न स्वीकारताच परत मंडळाकडे पाठवून दिले जात आहेत. आतापर्यंत दहावी, बारावीचे प्रत्येकी चार ते पाच विषयांची परीक्षा झाली आहे. मात्र, जोपर्यंत शासन मागण्यांसंदर्भात निर्णय घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने घेतली आहे.