पोलिसांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन पोलिसांच्या किरकोळ रजांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव गृहविभागाने महाराष्ट्र सरकारकडे पाठवला होता. या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील पोलिसांना मिळणा-या 12 किरकोळ रजांमध्ये वाढ करण्यात आली असून, पोलिसांना 20 किरकोळ रजा मिळणार आहेत.
म्हणून करण्यात आली वाढ
कायदा सुव्यवस्था, गंभीर गुन्ह्यांचा तपास तसेच मोर्चा, आंदोलने, राजकीय नेत्यांचा बंदोबस्त सांभाळणाऱ्या पोलिसांवरील कामाचा ताण वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. पोलिसांवर पडणाऱ्या कामाचा ताण विचारात घेऊन पोलिसांच्या हक्काच्या रजा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांना यापूर्वी 12 किरकोळ रजा मिळत होत्या. आता या किरकोळ रजांमध्ये वाढ करण्यात आली असून, नवीन नियमानुसार पोलिसांना वर्षभरात 20 किरकोळ रजा मिळणार आहेत.
( हेही वाचा: #GoaCM कोकणी भाषेत शपथ घेत ‘प्रमोद सावंत’ सलग दुसऱ्यांदा बनले मुख्यमंत्री! )
पोलिसांच्या रजांचे प्रमाण कमी
तसेच, ज्या पोलीस कर्मचा-याची दुस-या दिवशी रजा आहे अशा कर्मचा-याला आदल्या दिवशी रात्रपाळीवर बोलावले जाऊ नये, अशा सूचनाही गृहविभागाकडून देण्यात आल्या आहेत. किरकोळ रजांमध्ये वाढ करण्यात आल्याने पोलिसांना दिलासा मिळाला आहे. अन्य शासकीय विभागांच्या तुलनेत पोलिसांना मिळणा-या रजांचे प्रमाण खूप कमी आहे. सणासुदीलाही त्यांना हक्काची सुट्टी घेता येत नाही. महत्त्वाचे सण आणि उत्सवात पोलिसांच्या रजा रद्द केल्या जातात.
Join Our WhatsApp Community