एसटीचा संप १ एप्रिलला मिटणार? पवारांचा फॉर्म्युला ठरणार निर्णायक

131
मागील ४ महिन्यांपासून सुरु असलेला राज्य परिवहन महामंडळाचा संप कधी मिटणार, यासाठी राज्यातील सर्वसामान्य जनता अगदी चातकाप्रमाणे वाट आहे. बहुतेक संपकरी कामगारांना कामावर रुजू होण्याची इच्छा आहे, मात्र त्यांच्यावर बडतर्फ कामगारांकडून दबाव टाकला जात होता. आता विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बडतर्फ कामगारांसह सर्व संपकरी कामगारांनी कामावर रुजू व्हावे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे घोषित केले. त्यासाठी ३१ मार्चची मुदत दिली आहे. त्यामुळे आता कामगारांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली आहे. कामगारही कामावर रुजू होऊ लागले आहेत. या आधी रोज ५०-६० संपकरी कामगार सेवेत रुजू व्हायचे, मात्र गेल्या २ दिवसांत तब्बल १ हजाराहून जास्त कामगार रुजू झाले आहेत, म्हणून १ एप्रिलपासून राज्यात एसटीचा संप मिटण्याचाही आशा निर्माण झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळात रविवारी, २७ मार्चपर्यंत एकूण ३२ हजार ४६ कामगार कामावर रुजू झाले आहेत, तर अजूनही ४९ हजार ६३७ कामगार संपावर आहेत, मात्र या आठवड्यात संपकरी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास राज्य परिवहन महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

म्हणून संप सुरूच आहे… 

एसटीचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनाही बेमुदत संपाचे हत्यार उपसले. तब्बल ४ महिने हा संप सुरु आहे. मधल्या काळात राज्य सरकारने महामंडळाच्या कामगारांच्या वेतनात घसघशीत वाढ दिली, ७वा वेतना लागू करण्याची तयारी सुरु केली. तरीही संपकरी कामगार मात्र संपावर ठाम राहिले. त्यानंतरही उच्च न्यायालयाच्या आदेशावरून स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरून  संपकरी कामगार विलीनीकरणावर ठाम राहिले. यामुळे महामंडळाने संपकरी कामगारांना आधी निलंबित नंतर बडतर्फ करण्याची कारवाई सुरु केली. अशा प्रकारे १० हजार कामगार बडतर्फ झाले आहेत.

बडतर्फ कामगारांचा विरोध मावळला

एसटीच्या अनेक कामगारांना कामावर हजर व्हायचे होते, मात्र निलंबित आणि बडतर्फ कामगारांकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. आपल्या लढ्यासाठी आम्ही नोकरी गमावली आणि तुम्ही आता माघार घेत आहात, अशी बडतर्फ कामगारांची भावना होती. मात्र आता ३१ मार्चपर्यंत सेवेत रुजू झाल्यास या बडतर्फ कामगारांवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे स्पष्ट झाल्याने या कामगारांचीही सेवेत पुन्हा रुजू होण्याची मानसिकता तयार झाल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी केलेल्या अहवानाला संपकरी कामगार सकारात्मक प्रतिसाद देत असून ते पुन्हा सेवेत दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे १ एप्रिलपासून राज्यात एसटी सर्वत्र पुन्हा धावेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.