मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्यानंतर महापालिकेचे कामकाज पुढे चालवण्यासाठी आयुक्तांना आता प्रशासकीय समित्यांची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासकाच्या अध्यक्षतेखाली चार समित्या स्थापन करण्याचा विचार आहे. महापालिकेचे आयुक्त व प्रशासक असलेल्या इक्बालसिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समिती, सुधार समिती, महापालिका आणि या व्यतिरिक्त असलेल्या समित्यांकरता इतर एक समिती अशाप्रकारे चार समित्यांची स्थापना करण्याचा विचार असून लवकर याबाबतची कार्यवाही करून प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा : राँग साईड ड्राईव्ह; मुंबईत २० दिवसांत २१८३ गुन्हे दाखल )
समितीची शिफारस
मुंबई महापालिकेत मागील ८ मार्च २०२२ पासून महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, त्या दिवसापासून चहल हे अदयाप प्रशासकाच्या भूमिकेत दिसत नसून स्थायी समितीच्या सभेमध्ये राखून ठेवलेले १२३ प्रस्तावावर प्रशासक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. परंतु ७ मार्च नंतर २१ दिवस उलटत आले तरी या राखून ठेवलेल्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आले नाहीत.
अधिवेशनामुळे समित्या गठीत करण्यास विलंब
हे सर्व प्रस्ताव आता प्रशासकाच्या माध्यमातून मंजूर केले जाणार असले तरी प्रशासकांना याची जबाबदारी आपल्यावर घ्यायची नसून त्यांनी यासाठी समितीची शिफारस केल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये स्थायी समिती, सुधार समिती यांच्यासह महापालिकेच्या तीन समित्या स्थापन केल्या जाणार आहेत, तर शिक्षण, बेस्ट, आरोग्य, स्थापत्य शहर, स्थापत्य उपनगरे, विधी व महसूल, महिला व बाल कल्याण यासर्व समित्यांच् मिळून इतर एक समिती स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. विधीमंडळ अधिवेशनामुळे या समित्या गठीत करण्यास विलंब झाला असला तरी आता सरकारकडे केलेल्या शिफारशीनुसार या समित्यांना मान्यता मिळाल्यानंतर पुढील विकास कामांच्या प्रस्तावांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
प्रशासकाच्या अध्यक्षतेखाली या समित्या गठीत होणार असून यामध्ये सर्व अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, उपायुक्त आदींचा समावेश असेल अशीही माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community