दादरमधील चेंबरमध्ये अडकलेल्या वासराची सुखरूप सुटका

131
दादर येथील जी/उत्तर विभागातील भवानी शंकर मार्ग, राम मंदीर समोरील ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गाईचे वासरू पडले होते. सोमवारी, सकाळी ६:४५ वाजता महापालिकेच्या कंट्रोल रूमला याबाबतची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर त्वरीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गाईचे वासरू खाली पडल्याचे दिसून आले. शर्थीच्या प्रयत्नाने या वासराला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

म्हणून वासरू अडकले 

या ड्रेनेजचे चेंबर कोसळलेल्या अवस्थेत नव्हते. ड्रेनेज चेंबरची फ्रेमही व्यवस्थित होती. परंतु ड्रेनेज चेंबरचे कव्हर जागेवर नव्हते. थोड्या अंतरावर हे कव्हर पडलेले आढळून आले. संध्याकाळी अग्निशमन दल, घन कचरा व्यवस्थापक कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. या वासराला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. गाय पाळणा-या व्यक्ती गंगू नामदेव शिंदे यांना संपर्क साधून विचारणा केली असता या ड्रेनेज चेंबरवर कव्हर होते, परंतु वासराने पायाने कोरल्याने ते कव्हर बाजुला सरकले व गाईचे वासरू त्यात पडल्याचे समोर आले.

खड्डा खणून गाईचे वासरू उभे करण्यात आले.

गाय पाळणा-या व्यक्ती गंगू नामदेव शिंदे यांनी सांगितले की, आजुबाजूला फुटपाथ दुरुस्तीचे काम झाल्याचे दिसून आले, म्हणून कदाचित बाजुला काम सुरु असताना ड्रेनेजचे कव्हर सैल झाले होते. त्यानंतर हे चेंबर तोडून बाजुला ५ ते ५.५ फूट खड्डा खणून गाईचे वासरू उभे करण्यात आले. वासराला दोरीच्या सहाय्याने व्यवस्थित बांधून सर्व कर्मचा-यानी खड्डयातून सुरक्षितरित्या बाहेर काढले. या गाईच्या वासराला जखम झालेल्या ठिकाणी औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर गाईच्या वासराला गाई सांभाळणा-या व्यक्तीकडे सुखरूप सोपवण्यात आले. घटनास्थळी पर्जन्य जल वाहिनीचे दुय्यम अभियंता संतोष थोटे आणि अधिकारी वर्ग काळे, दुर्गे, राणे आदी उपस्थितीत होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.