ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय; मनसेने वेधले लक्ष

137

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. या समस्यांबाबत मनसेने निवेदनाद्वारे लक्ष वेधले. कुडाळ ग्रामीण रुग्णालयात कार्यरत स्त्रीरोगतज्ञ डॉ.वालावलकर हे मागील काही महिन्यांपासून आजारी असल्याने मेडिकल सुट्टीवर आहेत. डॉ.वालावलकर यांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेला अतिशय चांगली सेवा देवून रुग्णालय अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत गोरगरीब रुग्णांची तज्ञ डॉक्टरांच्या अभावी परवड होत असल्याच्या जनतेच्या तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या. शिवाय रुग्णालयात मुख्य डॉक्टर नसल्याने कर्मचाऱ्यांवर कुणाचाही धाक उरला नसल्याने अनेक कर्मचारी कामकाजाच्या वेळेत हॉस्पिटलमध्ये गैरहजर असतात.

( हेही वाचा : यशवंत जाधवांना संदीप देशपांडेंनी करून दिली महाभारताची आठवण! )

मनसेचा इशारा

वास्तविक कुडाळ मधील महिला बाल रुग्णालय अद्याप सुरु नाहीच, शिवाय जिल्हा रुग्णालय देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सेवा देण्याएवढे सक्षम नाही. अशा परीस्थितीत जनतेकडे खाजगी रूग्णालयाशिवाय पर्याय उरत नसून खाजगी रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवेच्या नावाखाली प्रचंड आर्थिक लूट केली जाते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे कुडाळ ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर नसणे म्हणजे एकप्रकारे खाजगी रुग्णालयांना अधिक लुटमारीची संधी दिल्यासारखेच आहे. प्राप्त परिस्थिती व जनभावना लक्षात घेता डॉ. वालावलकर पूर्ववत सेवेत हजर होईपर्यंत अन्य स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्रतिनियुक्ती देण्यात यावी अशी मनसेने आग्रही मागणी मनसेने निवेदनातून केली आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास मनसे जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर तालुका सचिव राजेश टंगसाळी, उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे, अविनाश अणावकर, विद्यार्थी सेना प्रमुख गुरू मर्गज, शाखाध्यक्ष वैभव धुरी, सचिन मयेकर आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.