मुंबई पोलीस आयुक्तपदी आलेले संजय पांडे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. संडेस्ट्रीटचा प्रयोग यशस्वी होताच मुंबई पोलिसांकडून ‘मुंबई पोलीस नावाचे स्टिकर्स असलेले ट्रॅक सूट, कॅप, परफ्यूम आणि पाण्याच्या बॉटल्स तयार करून त्यांची विक्री करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त यांनी घेतला आहे. या वस्तू विकून होणारा नफा हा पोलीस कल्याण निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे आयुक्त पांडे यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
आयुक्तांनी सोशल मीडियावर दिली माहिती
मुंबई पोलीस आयुक्त म्हणून संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून मुंबईकरांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुंबईकरांची प्रत्येक रविवारची सकाळ तणावमुक्त करण्यासाठी पांडे यांच्या संकल्पनेतून ‘संडे स्ट्रीट’चे आयोजन करण्यात आले. ही संकल्पना या रविवारी प्रत्यक्षात उतरवल्यानंतर आयुक्त पांडे मुंबईकरांसाठी लवकरच नवीन प्रयोग घेऊन येत आहे. हा प्रयोग असणार आहे, वस्तू तयार करून विकण्याचा. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नुकताच हा निर्णय घेतला असून सोशल मीडियावर त्याची माहिती देखील दिली आहे.
( हेही वाचा: दादरमधील चेंबरमध्ये अडकलेल्या वासराची सुखरूप सुटका )
मुंबई पोलिसांकडून परफ्यूम, पाणी बॉटल, टी-शर्ट, ट्रॅक सूट आणि कॅप या वस्तू तयार करण्यात येणार असून, या वस्तूंवर मुंबई पोलीस असे नाव असलेले स्टिकर्स असणार आहेत. या वस्तूंची विक्री मॉल, शो-रूम आणि ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. वस्तू विकून होणारा नफा पोलीस कल्याण निधीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त संजय पांडे यांनी सोशल मीडियावर दिली आहे. कपडे आणि परफ्यूम अव्वल दर्जाचे असून त्यांची किंमतही सर्वसामान्यांना परवडेल अशी असणार आहे. सोशल मीडियावर या निर्णयाचे स्वागत केले जात असून, अनेकांनी काही सूचनादेखील दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community