पुन्हा तिसऱ्या आघाडीसाठी हालचाली, आता कशासाठी?

120

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशभरात भाजप विरोधी पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी आणि एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता, परंतु तो सपशेल अयशस्वी ठरला. त्यानंतर २०२४च्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अशी आघाडी उभी करण्याची तयारी ममता बॅनर्जी यांनी सुरु केली आहे, मात्र त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा निमित्त ठरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी देशभरातील गैर भाजप सरकार असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे.

बिगरशासित राज्यांना लिहिले पत्र 

देशभरात सध्या बिगरभाजप शासित राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्या आहेत, असा आरोप विरोधी पक्षांचा आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात या कारवाया सर्वाधिक आहेत, असाही आरोप होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह बिगरभाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे भाजपविरोधात एकत्र या, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी या पत्रातून केले आहे. देशात सुडाचे राजकारण सुरू आहे. त्यानुसार ईडी, सीबीआय, आयबी, आयकर खात्यासह विविध यंत्रणांचा राजकीय वापरासाठी चुकीचा वापर होत आहे, असे सांगत या प्रकारावर ममता बॅनर्जी यांनी चिंताही व्यक्त केली आहे.

(हेही वाचा १०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात ३ हजार ६०३ पदांची भरती)

मुंबई किंवा दिल्लीत बैठक

या मुद्द्यावर विरोधी पक्षांची एक बैठक होण्याची गरज आहे. या बैठकीत पुढील वाटचाल आणि रणनीतीवर चर्चा केली गेली पाहिजे, असे बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीचे संकेत मिळताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांनी 27 मार्च रोजी हे पत्र लिहिले आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने हे पत्र मंगळवारी, २९ मार्च रोजी मीडियासमोर आणले. या पत्रातून तपास यंत्रणाचा होणाऱ्या गैरवापरावर चिंता व्यक्त करतानाच हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. भाजपच्या हुकूमशाही सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. त्यामुळे या मुद्द्यावर लवकरच एक बैठक बोलवून त्यात पुढील रणनीती आखली पाहिजे, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही पत्र लिहिले आहे. पवारांनीही ममता बॅनर्जी यांचे पत्र मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. या पत्रानंतर आम्ही लवकरच एक बैठक घेणार आहोत. ही बैठक दिल्ली किंवा मुंबई दोन्हीपैकी एका ठिकाणी होईल. बैठकीची तारीख अजून निश्चित नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.