१०० कोटींचे कथित वसुली प्रकरण अद्याप थंडावलेले नसताना मुंबईतील बारमध्ये बारबालांची पाऊले थिरकायला सुरुवात झाली आहे. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेले हे डान्सबार आता समाजसेवा शाखेच्या रडारवर आले आहेत. मुंबईत मागील आठवड्यात समाजसेवा शाखेने अंधेरी एमआयडीसी आणि चेंबूर चुनाभट्टी येथील बारवर छापे टाकून बारमालक, व्यवस्थापक, बारबाला, वेटर आणि ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. मात्र समाजसेवा शाखेच्या या कारवाईमुळे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
( हेही वाचा : कोरोना काळात दाखल झालेले गुन्हे घेणार मागे )
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने रविवारी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंधेरी- कुर्ला रोडवर असणाऱ्या ‘नाईट लव्हर बार अँड रेस्टॉरंट’ वर छापा टाकून बारमालक, व्यवस्थापक, वेटर, बारबाला आणि ग्राहकांसह ४० जणांना ताब्यात घेऊन त्यापैकी २८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्यापैकी १२ बारबालांची यामध्ये सुटका करण्यात आली आहे. समाजसेवा शाखेच्या सूत्रांनुसार नाईट लव्हर बारमध्ये नियमांचे उल्लंघन करून ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरू होता. बारबाला अश्लील हावभाव करून अश्लील डान्स करीत होत्या, तसेच ग्राहक त्यांच्यावर पैसेही उधळत होते. नाईट लव्हर बारवर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात बारबाला आढळल्यामुळे खळबळ उडाली असून याची कल्पना स्थानिक पोलिसांना नसावी का असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायन ट्रॉम्बे रोडवरील लक्ष्मी पॅलेस बारवर समाजसेवा शाखेने छापा टाकून १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालवून बारबालावर पैसे उधळले जात होते. नियमाचे उल्लंघन करून हा बार चालविण्यात येत होता अशी माहिती समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी दिली आहे. या दोन्ही छापेमारीचे गुन्हे स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करून त्याचे अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी पाठविण्यात आले आहेत.
मुंबईत लॉकडाऊनच्या काळात बंद असलेले बार पुन्हा एकदा नियमाचे उल्लंघन करून सुरू झाले आहेत. या डान्सबारला स्थानिक पोलिसांचे पाठबळ मिळत असून त्यांच्या आशीर्वादाने हे डान्सबार सुरू असल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये सुरू आहे. बारवर कारवाई करण्यात आली पण संबंधित पोलीस ठाण्यातील जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
Join Our WhatsApp Community