एसटी कामागारांकडे उरले फक्त २ दिवस…

170

सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कामगारांच्या हातात त्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी अवघे २ दिवस उरले आहेत. कारण ३१ मार्चनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला अल्टिमेटम संपणार आहे. त्यानंतरही जे कामगार संपावर असतील, त्यांना कदाचित कायमची नोकरी गमवावी लागेल, अशी शक्यता आहे. कारण हा अल्टिमेटम खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला असून तो विधानसभेत ऑन रेकॉर्ड आहे. अजित पवार यांचे व्यक्तिमत्व पाहिल्यास या अल्टिमेटमनंतर एसटी कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच अनेक कामगार सेवेत रुजू होण्याच्या मानसिकतेत आहेत. याआधी रोज ५०-६० संपकरी कामगार कामावर हजर होत असल्याचे चित्र होते, मात्र गेल्या दोन दिवसांत जवळपास १ हजार कामगार सेवेत रुजू झाले आहेत.

कामावर रुजू होणाऱ्यांची संख्या वाढली 

राज्य परिवहनच्या संपकरी कामगारांनी मागील ४ महिने संप सुरूच ठेवला आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी कामगारांनी हा संप सुरु केला आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने कामगारांना घसघशीत पगार वाढ दिली आहे. तरीही कामगार संपावर ठाम आहेत. तसेच विलीनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. तरीही एसटी कामगार संपावर ठाम आहेत. मात्र आता अजित पवारांनी अल्टिमेटम दिला आहे. तसेच जे कामगार कामावर रुजू होतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही, तसेच बडतर्फ कामगारही कामावर रुजू झाले तरी त्यांची सेवा पूर्ववत करण्यात येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे कामगारांना ज्या विषयाची भीती होती, ती कारवाई होणार नसल्याने कामगार मागील दोन दिवसांपासून मोठ्या संख्येने कामावर रुजू होऊ लागले आहेत. राज्य परिवहन महामंडळात सोमवारी, २८ मार्चपर्यंत एकूण ३२ हजार ३५२ कामावर रुजू झाले होते.

(हेही वाचा एसटीचा संप १ एप्रिलला मिटणार? पवारांचा फॉर्म्युला ठरणार निर्णायक)

आता रस्त्यावरची लढाई उपयोगाची नाही

जेव्हा संपामधून बाहेर पडून कामावर हजर झालो, तेव्हा मानसिक दडपण गेले. आता संप सुरु ठेवणे काही उपयोगाचे नाही. विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयात आहे, तो कुठपर्यंत चालणार आहे, हे माहीत नाही, त्यामुळे अखेर कामावर हजर झालो. सरकारने आमच्या तरुण कामगारांना चांगली पगारवाढ दिली आहे. मी सुरुवातीलाच कामावर हजर झालो असतो, पण मी पश्चिम महाराष्ट्राचा आहे आणि नोकरीसाठी माझा कोकणातील श्रीवर्धन आगार आहे. अशावेळी मी एकटाच कामावर रुजू झालो असतो तर मला विरोध झाला असता, म्हणून मी कामावर हजर झालो नाही. माझ्या घरची हलाखीची परिस्थितीत आहे, आई -वडील वृद्ध आहेत. त्यामुळे मी सेवेत रुजू झालो. भाऊदेखील एसटीत आहे, त्यालाही रुजू व्हायला सांगितले आहे. माझा मित्रही एसटीत होता, संपामध्ये सहभागी झाला, ५ महिने पगार नव्हता, तणावातून मागच्या आठवड्यात हृद्यविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला, अवघ्या तीस वर्षांचा होता तो. आता मंत्र्यांनीच कारवाई करणार नाही, असे आश्वासन दिले आहे, त्यामुळे कामावर हजर झालो. मी संपात सहभागी कामगारांना आवाहन करतो कि त्यांनी कामावर हजर व्हावे, कारण हे लढाई न्यायालयात सुरु आहे, त्यामुळे रस्त्यावर लढाई करून काही उपयोगाचे नाही.

– विठ्ठल गर्जे, चालक-वाहक, मुरुड आगार 

कोणीही घाबरण्याची गरज नाही!

आता एसटीच्या संपात सहभागी असलेल्या बहुतेक कामगारांची कामावर हजर होण्याची मानसिकता बनली आहे. पण दुखवट्यात असलेले कामगार त्यांना अजूनही अडवत आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल, अशी भीती दाखवत आहेत. वास्तविक मंत्र्यांनीच कारवाई करणार नाही असे जाहीर केले आहे, त्यामुळे कामगारांना घाबरण्याची गरज नाही. माझे तसे वैयक्तिक मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांनी आश्वासन दिले आहे, त्यामुळे आमच्या रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांत कामगारांची कामावर रुजू होण्यासाठी रांग लागली आहे.
– कांबळे, चालक-वाहक, पेण आगार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.