ओडिशातील दक्षता पथकाने भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षता पथकाने एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान, अधिकाऱ्यांच्या हाती १.३६ कोटी रुपयांची रोकड तसेच कोट्यवधी रुपयांचे दागिन्यांचे घबाड लागले. तसेच इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रंदेखील अधिकाऱ्यांनी जप्त केली. ते पाहून धाड टाकणारे अधिकारी देखील थक्क झाले.
काय आहे प्रकरण
ओडिशातील मलकानगरीमध्ये वास्तव्यास असलेला सरकारी अभियंता आशीष कुमार दासला गेल्या आठवड्यात शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी दास डीसीबी बँकेच्या व्यवस्थापकाला १०.२३ लाख रुपये देण्यासाठी गेला होता. दासला ताब्यात घेतल्यानंतर दक्षता पथकाने त्याच्याकडे असलेल्या काळ्या पैशांचा शोध सुरू केला. चार दिवसांनंतर दासशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू आढळल्यात.
केलेल्या कारवाईत १.३६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती दक्षता विभागाकडून देण्यात आली. ओडिशा दक्षता विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय पथकातील अधिकाऱ्यांना १.२ किलो सोनं सापडले. दास यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या, नातेवाईकांच्या नावे ऍक्सिस बँकेत १२ खाती उघडली होती. त्यामध्ये जवळपास २.२५ कोटी रुपये आहेत. ही सगळी खाती दास स्वत: पाहायचे. यासोबतच त्यांनी एफडी, बचत खातीही उघडली होती. त्यात ४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – एसटी संपावर मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र)
दासने त्याच्या पत्नीच्या नावे कटकमधल्या शांतीवन सोसायटीत एक फ्लॅट खरेदी केला. त्याची किंमत ३२.३० लाख रुपये आहे. पत्नीच्या नावे केओन्जर जिल्ह्यातल्या बारिपाल येथे भूखंडदेखील खरेदी केला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्य बँक खाती आणि दोन लॉकर्सच्या व्हेरिफिकेशनचे काम सुरू आहे.
Join Our WhatsApp Community