रत्नागिरीतील नाणार येथे रिफायनरी प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्यांमुळे रखडला होता. आता त्यावर तोडगा काढण्यासाठी हा प्रकल्प बारसू गाव या परिसरात उभारण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. तसे पत्रही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे.
पर्यायी गावांचा उल्लेख
रिफायनरी प्रकल्पासाठी 14 हजार एकर जागा देण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे. राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांचा आणि भागांचा उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे.
भूमिपुत्रांच्या न्यायाचा विचार केला जाणार
मागच्या काही दिवसांपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौ-यावर आहेत. यावेळी त्यांना नाणार प्रकल्पावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी नाणार येथे प्रकल्प होणार नसून, त्याऐवजी पर्यायी मार्ग काढला जाईल असे म्हटले आहे. भूमिपुत्रांना न्याय कसा मिळेल हे विचारात घेऊनच पुढील आखणी केली जाणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
( हेही वाचा : ठाकरे सरकारचे मुस्लिम प्रेम: अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय )
रिफायनरी प्रकल्पावरुन रत्नागिरीत घमासान
नाणेर ऐवजी हा रिफायनरी प्रकल्प राजापूरच्या बारसू गावाला हलवण्याचा पर्यायी मार्ग मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सुचवला. आता या प्रकल्पाला बारसू गावातील नागरिकांनीही विरोध केला आहे.