१ एप्रिलपासून एसटी पूर्ण क्षमतेने धावणार

160

मागील ४ महिन्यांपासून एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवरून बेमुदत संपावर असलेले संपकरी एसटीच्या कामगारांना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर हजर होण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्याला कामगारांनी सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. मागील २-३ दिवसांत कामावर हजर होऊ इच्छिणाऱ्या कामगारांनी बऱ्याच संख्येने अर्ज दिले आहेत, त्यामुळे वसई आगार येत्या १ एप्रिलपासून पूर्ण क्षमतेने धावणार आहे, असा विश्वास वसई आगाराचे व्यवस्थापक दिलीप भोसले यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. अशाच प्रकारे राज्यातील इतरही आगारांच्या व्यवस्थापकांना विश्वास वाटत आहे.

कामगारांची मानसिकता बदलली 

अजित पवार यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या आधी २ दिवस वसई आगार ५० टक्के क्षमतेने सुरु झाला आहे. आगारातील बसगाड्या दररोज ९ हजार किमी धावत आहेत, रोजची साडेतीन लाखापेक्षा अधिक रक्कम जमा होत आहे. प्रवाशांचाही प्रतिसाद चांगला आहे. कर्मचारी हजर होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांना आता पश्चाताप होऊ लागला आहे. कारण ५ महिने हे संपकरी कामगार वेतनाविना आहेत, उपाशी आहेत. आता त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. आम्ही आधीच शासनाची, प्रशासनाची हाक ऐकली असती, तर फायदा झाला असता. आम्ही उगाच मृगजळाच्या मागे धावलो, असे कामगार म्हणत आहेत. देशात, जगात बेकारीचे प्रमाण भयंकर आहे. पदवीधर, अभियंते बेकार आहेत. १०-१२ हजार रुपये वेतनासाठी दारोदारी भटकत आहेत. अशा वेळी शासनाने आम्हाला जी ५-६ हजार रुपये वेतनवाढ दिली आहे, ती चांगली आहे. ती आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आम्हाला पदरात घ्या, कामावर रुजू करून घ्या, अशी भूमिका कामगार व्यक्त करू लागले आहेत. वसई आगारात  मंगळवारी १५ कामगारांचे अर्ज आले आहेत. जे त्यांना कामावर रुजू करून घ्या, अशी विनंती करत आहेत, त्यामध्ये बडतर्फ कामगारही आहेत. वसई आगारातून वसई-पुणे, वसई-कोल्हापूर, वसई-आंबेजोगाई, वसई-लातूर, वसई-जळगाव, वसई-रत्नागिरी अशा लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु आहेत.

(हेही वाचा एसटी कामागारांकडे उरले फक्त २ दिवस…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.