दरेकरांच्या दारातूनच ‘आप’ने फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग

152
पंजाब राज्यात सगळ्या विरोधकांचा सुपडासाफ करून एकहाती सत्ता घेतल्यावर आम आदमी पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. कालपर्यंत ‘आप’ला महाराष्ट्रात बस्तान बसवणे कठीण गेले, त्या ‘आप’ला पुन्हा महाराष्ट्राचे आव्हान स्वीकारण्याची इच्छा झाली आहे, म्हणून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप सक्रिय झाली आहे, त्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर निमित्त बनले आहे.

प्रवीण दरेकरांच्या राजीनाम्याची मागणी 

राज्यात विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत अस्तित्व निर्माण करण्यासाठी ‘आप’ रस्त्यावर उतरली आहे. मुंबै बँकेतील घोटाळा प्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम आदमी पक्षाकडून (आप) मुंबईत आंदोलन करण्यात आले. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी नरिमन पॉईंट येथील भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी ‘आप’च्या कार्यकर्त्यांना अगोदरच रोखले. यावेळी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘आप’चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोनल करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. ‘आप’चे नेते धनंजय शिंदे आणि इतर कार्यकर्ते रस्त्यावर आडवे पडून प्रवीण दरेकर यांच्याविरोधात घोषणा देत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना सरळ उचलून गाडीत टाकले. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो, असे शिंदे म्हणाले.
‘आप’ला पुन्हा महाराष्ट्राची आशा
महाराष्ट्राचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे साहाय्य घेत ‘आप’ची स्थापना झाली. त्यामुळे साहजिकच ‘आप’ला महाराष्ट्राचे आकर्षण होते, म्हणूनच ‘आप’ने २०१२ साली स्थापनेपासून महाराष्ट्रात विविध निवडणुका लढवल्या, आम आदमी पक्षाने मुंबई महापालिका निवडणूक २०१७ लढवली होती, त्यावेळी ‘आप’ ला विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. अगदी २०१९ची विधानसभा निवडणूकही लढवली होती, मात्र कोणत्याही निवडणुकीत आपला विशेष यश मिळाले नाही, परंतु दुसरीकडे ‘आप’ने दिल्ली आणि आता पंजाब या दोन्ही राज्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ‘आप’ने पुन्हा एकदा नव्या दमाने महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे, असे चित्र आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.