बेस्ट कर्मचाऱ्यांचाच झाला विजय!

208

काही दिवसांपूर्वी बेस्ट उपक्रमाने प्रतीक्षा नगर आगारात फलक लावत आगारामधील सर्व वाहक-चालकांची बदली आणिक आगारात झालेली आहे, अशी माहिती कर्मचाऱ्यांना दिली. कंत्राटी बस गाड्यांच्या देखभालीकरिता बेस्ट प्रशासनाने वर्षाकाठी प्रती बस फक्त १ रुपया याप्रमाणे संपूर्ण प्रतीक्षानगर आगार ‘मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंत्राटदाराला दिले होते. याला संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांच्यासह आपली बेस्ट आपल्यासाठी या कर्मचारी संघटनेने विरोध केला होता. यानंतर बेस्टच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी वर्ग आक्रमक होऊन त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर आता औद्योगिक न्यायालयाने प्रतीक्षा नगर आगार बंद करण्यास स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.

( हेही वाचा : पगार वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट )

Best 6

कर्मचाऱ्यांचा विजय

औद्योगिक न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिल्यावर कर्मचारी वर्गाने बेस्ट कर्मचाऱ्यांचा प्रचंड विजय असा फलक आगारामध्ये लावत आम्ही हा लढा शेवटपर्यंत लढणार असे सूचित केले आहे. दरम्यान प्रतीक्षा नगर आगार कंत्राटदारांना देऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाकडून २ मार्च २०२२ ला आंदोलन करण्यात आले होते. यावेळी संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शशांक राव म्हणाले, २०१९ च्या संपादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार बेस्टचा विलिनीकरणाचा प्रश्न सोडवला जाईल, तसेच ३ हजार ३३७ बेस्ट बसगाड्या कायमस्वरुपी राखल्या जातील व या गाड्यांना लागणारे कर्मचारी नव्याने भरती केले जातील. असे आश्वासन उपक्रमाने दिले होते. परंतु याउलट आता बेस्ट प्रशासन केवळ खासगी गाड्या उपक्रमात भरती करत आहेत, असा आरोप शशांक राव यांनी केला आहे. स्वत:ची एकही गाडी उपक्रम खरेदी करत नाही. गेल्या दोन वर्षांत बेस्टच्या स्वमालकीच्या गाड्यांचा बस ताफा अर्ध्यावर आला आहे. आता १८०० गाड्या बेस्टकडे उरल्या आहेत. त्यातील १ हजार गाड्या पुढील वर्षापर्यंत भंगारात जातील, तर २०२५ पर्यंत स्वमालकीच्या केवळ २२५ बसगाड्या उरतील आणि जवळपास १० हजारांचा कर्मचारी वर्ग उरेल. तसेच कोरोना काळात अविरत सेवा देऊनही कर्मचाऱ्यांना आजवर थकीत कोविड भत्ता देण्यात आलेला नाही, असेही राव यांनी सांगितले.

आता औद्योगिक न्यायालयाने बेस्टचे प्रतीक्षा नगर आगार खासगी कंत्राटदाराला देण्यास स्थगिती दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.