सात दिवसांत तीन मृत मासे मुंबईच्या किना-यावर आढळून आल्याने पुन्हा समुद्रातील वाढत्या जलप्रदूषणाचा मुद्दा समोर आला आहे. गेल्या आठवड्यात तीस फूट व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेतील आढळून आल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी आणि सोमवारी दोन मृत डॉल्फिन किनारपट्टीवर आढळले. मुंबई किनाऱ्यावरील वाढते जलप्रदूषण सागरी जीवांसाठी घातक ठरत असून समुद्रातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे मासे मृत होत असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक अविनाश कुबल यांनी दिली.
( हेही वाचा : पगार वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट )
प्लास्टिक हे जलप्रदूषणाचे प्रमुख कारण
शुक्रवारी जुहू किनारपट्टीवर मृत डॉल्फिन आढळला. सोमवारी वांद्रे बॅंड स्टॅन्ड येथे पुन्हा मृत डॉल्फिन आढळला. यातील बॅंड स्टॅन्ड येथे आढळलेला डॉल्फिन कुजलेल्या अवस्थेत होता.
समुद्रातील वाढत्या जलप्रदूषणाचे प्लास्टिक हे प्रमुख कारण ठरत असल्याची माहिती कुबल देतात. प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण सागरी जीवांच्या पोटात जात आहेत. कालांतराने त्यांचा मृत्यू होत आहे. वाढत्या जलप्रदूषणात संपर्कात आलेल्या सागरी जीवांना कित्येकदा खोल समुद्रात पुन्हा जाणे अवघड होऊन बसते. रसायनाचे तवंग माशांच्या खवल्यांना चिकटतात. परिणामी त्यांची श्वसन प्रक्रिया मंदावते. डॉल्फिन हा सस्तन प्राणी असला तरीही प्लास्टिक किंवा जलप्रदूषणामुळे त्याच्याही अस्तित्वाला आता धोका पोहोचत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती कुबल यांनी दिली.
Join Our WhatsApp Community