कुरबुरी कायम! आता शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज

119

महाविकास आघाडीमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून नाराजीचे सूर ऐकू येत आहेत. नुकतेच काॅंग्रेसचे 25 आमदार नाराज असल्याची बातमी समोर आली होती. आता त्यातच शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे समजते. विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाला शिवसेना अतिशय आक्रमकपणे उत्तर देत असताना, राष्ट्रवादी मात्र नरमाईची भूमिका घेत असल्याने शिवसेनेत नाराजी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांकडे बोलून दाखवल्याचे वृत्त एका खासगी वाहिनीने दिले आहे.

आम्हीच लढत आहोत

महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून सतत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरांवर धाडी पडत आहेत. त्याविरोधात शिवसेना विरोधी पक्ष भाजपाला आक्रमक पद्धतीने उत्तर देत असताना, राष्ट्रवादी मात्र साॅफ्ट भूमिका घेत असल्याचे शिवसेनेला वाटते. राष्ट्रवादीने भाजपविरोधात कधी कधी नरमाईचा सूर लावला याचा पाढाच शिवसेनेने वाचून दाखवला आहे.

  • १३ मार्चला मुंबई पोलिसांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसीतील मुंबई पोलिसांच्या सायबर विंगमध्ये जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. मात्र त्यानंतर गृह मंत्रालयानं अचानक निर्णय बदलला. पोलीस अधिकारीच फडणवीसांच्या निवासस्थानी गेले. शिवसेना नेत्यांना ही बाब खटकली. गृह मंत्रालय ज्याप्रकारे पोलीस दल हाताळत आहे, त्याबद्दल शिवसेना समाधानी नाही. गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे.
  • गेल्या वर्षी भाजपच्या 12आमदारांना विधानसभेतून निलंबीत करण्यात आले. या प्रकरणावर अजित पवारांनी घेतलेली भूमिका शिवसेनेला पटली नाही. आमदारांना काही तास वा काही दिवसांसाठी निलंबीत केले जाऊ शकते असे मत अजित पवारांनी व्यक्त केले होते.
  • 28 मार्चला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार माजिद मेमन यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमन उधळली. मोदींना लोकांनी कौल दिला आहे. त्यांच्यात काहीतरी चांगले गुण असावेत किंवा त्यांनी चांगली कामे केलेली असावीत, मात्र ती विरोधकांना शोधता येत नसावीत असे ट्वीट करत मेमन यांनी म्हटले होते.

( हेही वाचा: एसटी महामंडळाच्या अडचणींत वाढ! )

राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर

त्यामुळे भाजपविरोधात लढाई आम्हीच करत आहोत. शिवसेना आणि शिवसैनिक हे फ्रंटफूटवर आहेत. तर राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.