मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला अर्थात मराठी नवीन वर्षाच्या दिवशी मराठी भाषा भवनाची पायाभरणी करण्यात येणार आहे. जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.
मराठी भवनासाठी 126 कोटी रुपये लागणार
मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्र दक्षिण मुंबई परिसरात आणि उपकेंद्र ऐरोली, नवी मुंबई येथे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. मराठी भाषा भवन व मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे. मराठी भाषा भवन मुख्य केंद्र उभारणीकरिता गिरगाव, जवाहर बाल भवन, चर्नीरोड, मुंबई येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता रिक्त भूखंड विनामोबदला मराठी भाषा विभागास देण्याचा निर्णय झाला आहे. सुमारे 2100 चौ.मी. क्षेत्र मराठी भाषा भवनास मिळणार आहे. अंदाजे 126 कोटी रुपये एवढा खर्च मराठी भाषा भवन उभारणीसाठी लागणार आहे. मुंबईच्या मे. पी.के. दास ॲण्ड असोसिएट्स यांची वास्तू विशारद म्हणून निवड करण्यात आली आहे.
(हेही वाचा ताठर भूमिका घेणा-या एसटी कामगारांवर कारवाई अटळ; नवीन भरती करणार)
असे असेल मराठी भाषा भवन?
- प्रस्तावित मराठी भाषा भवन चर्नी रोडला समुद्र किनारी उभे राहणार आहे.
- प्रकल्पाची जागा चर्नी रोड येथील समुद्राभिमुख भूखंडावर असेल.
- मराठी भाषा भवन हे (G+7) तळमजला अधिक सात मजल्याचे आहे. संकल्पनेनुसार पहिल्या मजल्यावर एक खुले सार्वजनिक मंच असेल.
- इथे मरीन ड्राईव्हच्या लोकांना थेट प्रवेश करता येईल. मरीन ड्राईव्हपासून या मंचापर्यंत पायऱ्यांची मालिका जाईल.
- इमारतीमध्ये 200 आसन क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, 145 क्षमतेचे अॅम्फी थिएटर, चार मजल्यांवर प्रदर्शनासाठी जागा असेल.
- हा नकाशा अभ्यागतांकडून त्यांच्या मूळ स्थानासह प्रत्येक वैयक्तिक संकेतस्थळ आणि व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास करण्यासाठी डिजिटल पद्धतीने वापरता येईल.
- इमारतीमध्ये 200 क्षमतेचे सभागृह आहे आणि ते तळघरात बांधलेल्या भागात असेल.
- इमारतीच्या मागील बाजूस बहुमजली वाहनतळ प्रस्तावित आहे.