महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमने-सामने आहेत. असे असले तरी मनसेला आपली जागा निर्माण करावी लागणार आहे. सत्तेमुळे कठोर भूमिका घेताना शिवसेनेच्या झालेल्या कोंडीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित अयोध्या दौऱ्याची तारीख येत्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित मेळाव्यात जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
(हेही वाचा – इंधनदर अजून भडकणार? १० दिवसांत पेट्रोल-डिझेल दरात साडेसहा रुपयांनी वाढ)
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित मेळाव्यात अयोध्येला आपण का जायचे, ही भूमिकाही राज ठाकरे जाहीर करणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करताना केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या वापराबाबतही ते भाष्य करणार असल्याची शक्यता आहे.
मनसे हिंदुत्वाची जहाल भूमिका घेणार?
गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे अयोध्येला जाणार, असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र कोरोना निर्बंधामुळे त्यांचा दौरा लांबणीवर गेला होता. आता कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्याची तारीख शनिवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यावरून जाहीर प्रखर भूमिका घेण्यात अडचण आहे. ही शिवसेनेची कोंडी झाली असल्याने हीच संधी साधत मनसे हिंदुत्वाची जहाल भूमिका घेणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित मेळाव्यात आपण हिंदुत्वाची भूमिका का घेत आहोत, याची मीमांसा राज ठाकरे मेळाव्यात करणार आहेत. मागील गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज यांनी ‘लाव रे तो व्डिडीओ’ अशी घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले होते. आता येत्या महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून राज ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडणार असल्याचे संकेत वर्तविले जात आहे.