तथाकथित निधर्मीयतेमुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही हिंदूंचे अस्तित्व या देशातून संपुष्टात येणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. कारण देशातील १० राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक बनले आहेत, असे धक्कादायक वास्तव केंद्र सरकारने न्यायालयात मांडले. त्यामुळे कधी नव्हे इतके हिंदूंचे संघटन करणे आवश्यक झाले आहे.
यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तयार केलेल्या हिंदू धर्म ध्वजासारखे दुसरे कोणतेही प्रभावी माध्यम ठरू शकत नाही. याची सुरुवात समस्त हिंदूंनी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या बाहेर गुढीसह हिंदू धर्मध्वज उभारुन करा.
हिंदूंसाठी चेतनादायी ध्वज
एक वेष, एक राष्ट्र, एक संस्कृती, एक रक्त, एक बीज, एक भूतकाळ आणि एक भवितव्य या विषयांना वीर सावरकर यांनी तयार केलेला हिंदू ध्वज कायम प्रतिबिंबीत करत असतो. हा हिंदू जातीचा अप्रतिम आणि अभिनव असा ध्वज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जेव्हा या हिंदू ध्वजाची निर्मिती केली, तेव्हा त्याचा रंग आणि त्यामध्ये समाविष्ट केलेली प्रतिके यांचा विशेषत्वाने आणि गांभीर्यपूर्वक विचार केला. त्यामुळेच हा ध्वज अखिल मानव जातीमध्ये सर्वश्रेष्ठ ठरला आहे. हा ध्वज समस्त हिंदू धर्माचे प्रतिक आहे. चैत्र प्रतिपदेच्या आरंभी होणारे नवसंवत्सर हे हिंदूंसाठी नवसृजन आहे. त्यामुळे त्याचे स्वागत हिंदूंच्या महानतेचे दर्शन घडवत असलेल्या वीर सावरकर यांनी निर्माण केलेल्या हिंदू ध्वजाने करणे हे आजच्या घडीला हिंदूंसाठी चेतनादायी ठरणार आहे.
ध्वजाचे महत्व
शस्त्रबळावाचून धर्मविजय पंगू असताे; धर्मबळावाचून नुसता शस्त्रविजय पाशवी असतो, हे वीर सावरकर यांचे तत्व होते, म्हणूनच धर्म आणि शस्त्र यांचे महत्व जाणून त्यांच्या प्रतिकांना हिंदू ध्वजामध्ये यथोचित स्थान देण्यात आले. या ध्वजामध्ये कुंडलिनी आहे, खाली कृपाण तसेच स्वस्तिक देखील आहे. ही सर्व प्रतिके हिंदूंचा विकास, उज्ज्वल भविष्य आणि त्यांचे संरक्षण याची शाश्वती देतात.
कृपाण – वीर सावरकर लिहितात, प्रत्यक्ष धर्म हाही कृपाणाची दंडशक्ती आहे, म्हणूनच सुरक्षित आहे. विशेषतः आपल्या हिंदू जातीच्या अवनतीस ह्या कृपाणाचे, ह्या शक्तीचे, ह्या ऐहिक अभ्युदयाचे जे विस्मरण झाले, त्याकडे जे आम्ही अपराधीपणे दुर्लक्ष केले तेच मुख्य कारण झाले आहे. यापुढे असे दुर्लक्ष न करण्याचा आम्ही हिंदूंनी निर्धार केलेला आहे, हे सर्व शत्रूंस आणि मित्रांस बजावून सांगण्यासाठी आमच्या हिंदू संघटनांच्या ह्या महान ध्वजावर कृपाण अंकित झाले पाहिजे.
ओम् कार युक्त कुंडलिनी – या विषयासंबंधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विस्तृत विवेचन करताना म्हटले की, लोकांची धारणा करतो तो धर्म. धारणांत धर्म इत्याहु धर्मो घारयति प्रज्ञा! त्या धर्माची साध्ये दोन, अभ्युदय आणि निश्रेयस – ऐहिक भक्ती, पारलौकिक निश्रेयसाचे, अतींद्रिय आनंदाचे, पारमार्थिक परम गंतव्याचे जे द्योतक या ध्वजावर अंकित केलेले आहे ते म्हणजेच कुंडलिनी होय. ती कोण्या वर्णाची अथवा जातीची मत्ता नसून मनुष्यमात्रांत अंतर्हित आहे. मूलाधार (Sacral Plexus), स्वाधिष्ठान, मणिपुर (Naval) अनाहत, विशुध्द, आज्ञा, सहस्रार (Pineal gland where the spinal cord ends in a sort of ball floating in the brain) मूलाधारात सुप्त असणारी शक्ती, ती कुंडलिनी, योगध्यानाने जागृत होताच प्रत्येक केंद्रातून वर चढत, अलौकिक सिध्दी आणि अनुभव उपभोगीत सहस्राराच्या अंतीम केंद्रास पोहचते. आणि तिथे ती पोहचतांच साधकास एक अलौकिक अतींद्रिय अगाध आनंद प्राप्त होतो. हा अनुभव प्रत्येकास आलाच पाहिजे. मग त्याचा विश्वास एखाद्या विशिष्ट पैगंबरावर, अवतारावर, ग्रंथावर, पांथिक मतमतांतरावर असो वा नसो. यास्तव आपल्या हिंदू धर्मातील चार्वाकपंथी लोका – यतिकांसुध्दा यच्चयावत पंथांचा कुंडलिनी योगाविषयी मतभेद नाही. वैदिक, सनातनी, जैन, शीख, ब्राम्हो, आर्य समाज इत्यादी झाडून साऱ्या धर्म, पंथास कुंडलिनी योग मान्य आहे. कारण ते प्रत्येक्ष आणि प्रयोगात्मक शास्त्र आहे. केवळ शाब्दिक वा तार्कीक असा एखादा मताचा वाद नाही. ह्यास्तव हिंदू धर्माचे जे पहिले महान पारलौकिक ध्येय आहे, त्याचे द्योतक असे अत्युत्तम चिन्हं कुंडलिनी हेच होऊ शकते. कारण ते हिंदुमात्रासच नव्हे तर, मनुष्यमात्रास बुध्दीगम्य आहे. अनुभाव्य आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदू ध्वजामध्ये अर्थात भगव्या ध्वजामध्ये जी प्रतिके समाविष्ट केलेली आहेत, ती हिंदूंकरता प्रेरक आहेत, त्यांच्यातील वीरतेचे दर्शक आहे आणि त्यांच्या संरक्षणाची शाश्वती देत आहेत. म्हणून चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याला या हिंदू नववर्षाचे स्वागत समस्त हिंदूंनी घराच्या बाहेर गुढीला वीर सावरकरनिर्मित हिंदु धर्मध्वज उभारुन वीरता, साहस आणि धर्माच्या प्रति निष्ठा दर्शवावी, ज्यामुळे हिंदूंवर वक्रदृष्टी टाकणा-यांसाठी हा इशाराही ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथे वीर सावरकरनिर्मित हा भगवा ध्वज समस्त हिंदूंना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community