मेट्रोच्या लोकार्पणाआधीच भाजप-शिवसेनेत श्रेयवादावरून जुंपली

127
पुण्यातील मेट्रो मार्गाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील श्रेयवाद सर्वश्रुत होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. त्याआधी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेट्रोची पाहणी करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यावर मोदींवर पर्यायाने भाजपवर टीका करण्यात आली. आता हीच श्रेयवादाची लढाई मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाबाबत सुरु झाली आहे. परंतु यावेळी भाजप आणि शिवसेना यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

भाजपने सुरु केलेले प्रकल्प

मुंबईत पहिली मेट्रो लाईन काँग्रेस आघाडीच्या काळात २०१४ मध्ये सुरु झाली. नंतरच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपा-शिवसेना यांचे युती सरकार आले. या सरकारच्या काळात मुंबई आणि महामुंबई परिसरात ७ मेट्रो प्रकल्पांचे काम सुरु झाले. भूसंपादनापासून ते प्रकल्प उभारणीसाठी युती सरकारच्या काळात काम सुरु झाले. त्यासाठी केंद्राकडून आवश्यक परवानग्या आणि निधीही उपलब्ध करून घेतला. आता मुंबईत एक-एक करत मेट्रोचे प्रकल्प पूर्णत्वास येऊ लागले आहेत. आता जेव्हा हे प्रकल्प पूर्ण होत आहेत, तेव्हा शिवसेनाप्रणित दोन्ही काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे झळकले फलक 

शनिवारी, २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई मेट्रोच्या 2-ए (Metro 2A) आणि मेट्रो ७ या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र मेट्रो मार्गांच्या उद्धघाटनाआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई जुंपली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे शहरात जोरदार बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असून ‘काम केलंय मुंबईने पाहिलंय’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या ३३७ कि.मी. १,४०,४३३ कोटी रुपये असा आशय लिहीत देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देण्यात आले आहे. एकीकडे पाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए या मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहे, मात्र त्याआधीच भाजपने वांद्रे येथे मोठे फलक लावत शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे शिवसेना आता याला का उत्तर देते हे पहावे लागेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.