मुंबईच्या माजी महापौरांसह १० जणांना अटक

156

बैलांच्या झुंजीचे अनधिकृतपणे आयोजन केल्याप्रकरणी तसेच एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील १२ प्रमुख संशयित आरोपींसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, शिवसेनेचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांच्यासह १० जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली. पुढे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली.

काय आहे प्रकरण?

प्युअर अनिमल लव्हर (पाल) या प्राणी प्रेमी संस्थेच्या माध्यमातून सुप्रिया मधुकर दळवी (रा. कोळब, मालवण) यांनी गुरुवारी मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार या सर्वांवर भादवि कलम ४२९, ३४ यासह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवण तालुक्यातील तळगाव गावडेवाडी तलावानजिक दोन दिवसांपूर्वी बैल झुंजीचे अनधिकृतपणे आयोजन करण्यात आले होते. याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले. यात बैलांचा होत असलेला छळ, बैलांना झालेली दुखापत हे स्पष्टपणे दिसत होते. हजारो लोकांचा जमाव दिसून येत होता. या झुंजीत जखमी झालेल्या एका बैलाचे निधन झाले. त्यांनतर प्राणी मित्र संघटनानी एकत्र येत त्या व्हिडिओ मधील व्यक्तींची खातरजमा केली. आयोजकांबाबत माहिती मिळवली त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

कोणावर झाले गुन्हे दाखल?

या घटनेत बैलांची अनधिकृत झुंज लावणे, बैलांना क्रूरतेने व अमानुष वागणूक देऊन एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखपतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी १२ प्रमुख संशयितां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दत्ता दळवी (तळगाव), बाळा पेडणेकर (सुकळवाड), आझीम मुजावर (नेरुर कुडाळ), बाबू ताम्हाणेकर (सुकळवाड), अभि शिरसाट (कुडाळ), आशिष जळवी (कविलकट्टा कुडाळ), सुनील मांजरेकर (नेरुर), अनिल मांजरेकर (नेरुर), रुपेश पावसकर (कविलगाव कुडाळ) विकी उर्फ सनी केरकर (आसोली वेंगुर्ला), जयगणेश ज्ञानदेव पावसकर (कविलगाव नेरुर) व शुभम नारायण कुंभार (कुडाळ कुंभारवाडी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(हेही वाचा – मंगळवारी पूर्व उपनगरांतील ‘या’ भागात पाणीकपात)

या झुंजीत रुपेश पावसकर यांच्या मालकीच्या बैलाची विकी उर्फ सनी केरकर यांच्या मालकीच्या बैलाशी झुंज झाली. यात विकी केरकर यांचा बैल जखमी होऊन त्याला शिरोडा येथील डॉक्टरकडे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना मालवण न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. याबाबत सिंधुदुर्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.