नूतन वर्षाभिनंदन

107

शालिवाहन नावाचा राजा या आर्यावर्तात महापराक्रमी राजा म्हणून वंदनीय ठरला. चेतनाहीन, पौरुषहीन आणि पराक्रम हीन बनलेल्या आपल्या बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. हीन, दीन, असमर्थ आणि मुर्दाड बनलेल्या मानवी समाजाला सामर्थ्य संपन्न करण्याची किमया शालिवाहनाने केली.‌ दुर्बल आणि निस्तेज झालेल्या समाजाला तुम्ही अमृताचे पुत्र आहात याची प्रचिती आणून दिली. आपल्या सांस्कृतिक परंपरेचा जागर त्याने केला. निद्रीस्त समाजाला जागे करून त्यांच्यात वीरवृत्ती निर्माण केली.

( हेही वाचा : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीसह वीर सावरकरनिर्मित भगवा ध्वज उभारुन करा! )

आसुरी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी गुढीच्या रूपातील विजयपताका

आज आपला समाज आपल्याच संस्कृतीपासून दूर चालला आहे. शालिवाहन राजाप्रमाणे आपल्या समाजाला पुनश्च आपल्या संस्कृतीकडे वळवण्याचा प्रयास करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. आजही आपल्या समाजाला जागृत करण्याची नितांत आवश्यकता आहे. समुद्र उल्लंघून जाण्याच्या वेळी कपाळाला हात लावून बसलेल्या हनुमंताच्या पाठीवरून हात फिरवून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या जांबुवंताची आजही गरज आहे. सहिष्णुतेचा अतिरेक करणाऱ्या आणि शस्त्रांविषयी मनात घृणा बाळगणाऱ्या बांधवांना मार्गदर्शनासाठी श्रेष्ठ मार्गदर्शक योगेश्वर कृष्णाची गरज आहे.

आजच्या परमपवित्र दिवशी पुरुषार्थ गाजवणाऱ्या, पराक्रमी आणि सांस्कृतिक परंपरा प्राणपणाने जतन करणाऱ्या वीरांचे स्मरण करायचे आहे. जगात वाढत जाणाऱ्या आसुरी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी गुढीच्या रूपातील विजयपताका उभी करायची आहे. मांगल्याचे आणि पवित्र्याचे वातावरण आसमंतात निर्माण करण्यासाठी अविरत झटणारा मानवी समाज निर्माण करण्याचा संकल्प आपण आजच सोडायचा आहे. मन शांत, स्थिर, सात्विक, भोगरहित आणि ध्येयवादी बनवणे हेच मानवाचे जीवन ध्येय आहे.

थोडक्यात मृतवत बनलेल्या मानवामध्ये चैतन्य निर्माण करून अस्मिता जागृत करण्याचा वसा आजच्या दिवशी सर्वांनी घ्यायचा आहे. मानवाचा देह आपल्याला प्राप्त झाला आहे. मिळालेले हे जीवन भगवंताचा प्रसाद आहे. ही भावना दृढ धरून धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांचे रक्षण करणे हेच भगवंताचे कार्य आहे. हीच त्याची उपासना आहे. हा विचार अंत:करणात कोरुन त्याप्रमाणे वीर पुरुषांच्या पदपथावरून वाटचाल करण्यासाठी ही वर्षप्रतिपदा साजरी करायची आहे. श्रीरामांचा आणि श्रीकृष्णाचा सैनिक बनण्याचा आज संकल्प करायचा आहे. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात…

हंता रावण का है अपना,
रामवीरवर सेनानी
कर्मयोगका देव है स्वयं,
कृष्णसारथी अभिमानी
भारत तेरे रथ को सेना,
कौन रोकने वाली है
फिर देर क्यौं उठो भाई,
हमी हमारे वाली है ।।

श्री. दुर्गेश जयवंत परुळकर
व्याख्याते आणि लेखक

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.