कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर सईल याच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता समाज माध्यमांवर वर्तवली जात असल्याने, राज्याचे गृहमंत्री यांनी सईलच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकांना हे आदेश देण्यात आले आहेत. सईलच्या मृतदेहावर जे.जे.रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलेले असून, त्याचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चौकशीचे आदेश
प्रभाकर सईल हा कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणातील पंच/ साक्षीदार होता. त्याचबरोबर दुसरा साक्षीदार किरण गोसावी याचा अंगरक्षक होता. या हायप्रोफाईल प्रकरणातील साक्षीदार असलेला आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांना अडचणीत आणणारा प्रभाकर सईल याचे शुक्रवारी चेंबूर येथील म्हाडा वसाहत याठिकाणी हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले. मात्र सईलचा मृत्यू हा संशयास्पद असल्याच्या चर्चा होऊ लागल्यामुळे, त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश शनिवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.
(हेही वाचाः प्रभाकर साईलच्या मृत्यूने आर्यन खान प्रकरणावर काय होणार परिणाम?)
शवविच्छेदनाच्या अहवालात काय?
दरम्यान प्रभाकर सईल याच्या मृतदेहाचे शनिवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनादरम्यान डॉक्टरांनी सईल याचे विशेरा (पोटातील नमुने) काढून ते कलिना फॉरेन्सिक लॅब येथे तपासणीसाठी पाठवले आहेत. दरम्यान शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल राखून ठेवला असून, लवकरच तो पोलिसांच्या हाती देण्यात येईल, असे सांगाण्यात आले आहे.
कॉर्डिलिया क्रूझ प्रकरण काय होते?
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेकांना ड्रग्स प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण शाखे(एनसीबी)चे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी अटक केली होती. या कारवाईच्या दरम्यान घटनास्थळी झालेल्या पंचनामादरम्यान पंच आणि साक्षीदार म्हणून प्रभाकर सईलसह किरण गोसावी आणि इतर साक्षीदार होते.
आर्यन खान आणि इतरांच्या अटकेनंतर कॉर्डिलिया क्रूझवरील कारवाईला राजकीय वळण लागले आणि ही कारवाई बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला होता व त्यांनी काही पुरावे समोर आणले होते.
(हेही वाचाः निर्बंधसक्तीकडून निघालो आहोत पण… काय म्हणाले मुख्यमंत्री?)
कोण आहे प्रभाकर सईल?
कॉर्डिलिया ड्रग्स प्रकरणातील साक्षीदार असलेला प्रभाकर सईल हा फुटला होता व त्याने किरण गोसावी याच्यासह समीर वानखेडे यांच्यावर आर्थिक देवाणघेवाण संदर्भात गौप्यस्फोट केला होता. या सर्व प्रकरणात शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत झालेल्या व्यवहारासंदर्भातील पुरावे समोर आणले होते. प्रभाकर सईलने वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी एनसीबीच्या दक्षता पथकाने सुरू केली होती. सईलचा यासंदर्भात दक्षता पथकाकडून जबाब नोंदवण्यात आला होता. या सर्व प्रकरणात समीर वानखेडे यांची बदली झाली होती.
मृत्यूचे कारण काय?
प्रभाकर सईलच्या जीवाला धोका असल्यामुळे त्याला पोलिस संरक्षण देखील देण्यात आले. मात्र मागील काही महिन्यांपासून प्रभाकर सईल हा चर्चेत नव्हता. हे सर्व प्रकार संशयास्पद वाटत असून, सईलचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, त्याच्या मृत्यूमागे काही घातपात तर नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.
Join Our WhatsApp Community