आता मुंबईतील नव्या मेट्रो स्थानकाबाहेर मिळणार भाड्याने सायकल!

110

गुढीपाडव्याचे औचित्य साधून शनिवारी मुंबईत दहिसर-कांदिवली-गोरेगाव या नव्या मेट्रो मार्गावरील सेवा सुरू करण्यात आली. या सुविधेबरोबरच येथील मेट्रो स्थानकांवर सायकल सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा मेट्रो स्थानकांवर MYBYK या ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे लोकांना त्यांच्या घरी किंवा कार्यालयात जाण्यासाठी बस किंवा ऑटो रिक्षासाठी रांगेत उभे राहायला लागू नये, हा यामागील उद्देश आहे. यामुळे प्रवासातील वेळेच्या बचतीसह लोकांचा एकप्रकारे व्यायामही होईल.

कशी घेता येईल सायकल

या सायकलच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलमध्ये MYBYK नावाचे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्याद्वारे या सायकलचे लॉक उघडू शकता आणि लॉक उघडताच तुमचे भाडे सुरू होईल. सायकलचे भाडे खूपच कमी असून प्रति तास दोन रुपये असे आहे. जेवढा वेळ संबंधित व्यक्तीकडे सायकल राहिलं, तेवढे भाडे आकारले जाईल. काम झाल्यावर ती सायकल मेट्रो स्थानकाखाली पार्क करू शकता. आता या सायकलला मुंबईकरांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पुढील काळात समजेल.

(हेही वाचा – भारतीय हवाई दलाकडून चेतक हेलिकॉप्टरच्या सेवांचा सन्मान)

पाडव्याच्या मुहुर्तापासून मुंबईकरांना भेट

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ आणि दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो २ अ या दोन्ही मार्गांचा पहिला टप्पा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रवाशांच्या सेवेत खुला करण्यात आला आहे. मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो २ अ या मार्गावरील प्रत्येकी ९ स्थानके प्रवाशांच्या सेवेत असतील. त्यामुळे पाडव्याच्या मुहुर्तापासून दोन मेट्रो मार्गिकांची भेट मुंबईकरांना देण्यात आल्या असून मेट्रो मार्गिका २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेच्या फेऱ्यांना सुरूवात झाली आहे.

कोणत्या स्थनाकादरम्यान धावणार मेट्रो?

पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास वेगवान करण्यासाठी ‘मेट्रो २’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. ‘मेट्रो २’ मार्गिकेअंतर्गत दहिसर ते डी. एन. नगर अशी ‘मेट्रो २ अ’ मार्गिका तर दहिसर ते अंधेरी अशी ‘मेट्रो ७’ ही मार्गिका असणार आहे. दहिसर ते डहाणूकरवाडी मेट्रो २ अ मार्गावरील दहिसर, आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एक्सर, पहाडी एक्सर, कांदिवली, डहाणूकर वाडी या स्थानकांवर मेट्रो धावेल; तर मेट्रो ७ मार्गावर आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवी पाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरी पाडा या स्थानकांदरम्यान मेट्रो धावणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.