सॅटलाईट टॅगिंग केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या स्वभावाचे पॅटर्न जाणून घ्या….

142
राज्याच्या किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणा-या ऑलिव्ह रिडले कासवांच्या तीन महिन्यांच्या सॅटलाईट टॅगिंगच्या प्रयोगात पहिल्यांदाच त्यांच्या भ्रमणमार्गाचे पॅटर्न आणि स्वभावाची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पाच ऑलिव्ह रिडले कासवांचे सॅटलाईट टॅगिंग केल्यानंतर तीन महिन्यांत दोन कासवांनी राज्याची सीमारेषा ओलांडली आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी राज्याच्या किनारपट्टीला भेट देणारी बहुतेक ऑलिव्ह रिडले कासव समुद्रात सरळरेषेत जात नाही, असे निरीक्षण सॅटलाईट टॅगिंग करणारे भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश कुमार यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले.
 सॅटलाईट टॅगिंग केलेली पहिले कासव ‘प्रथमा’ गुजरातच्या दीव समुद्रात

जानेवारी महिन्यात वेळास समुद्रकिना-यावरुन सॅटलाईट टॅगिंग केलेली प्रथमा ही पहिली मादी ऑलिव्ह रिडले कासव सध्या गुजरातच्या समुद्रकिना-यात स्वैर संचार करत आहे. प्रथमाने आतापर्यंत अंदाजे ३३० किलोमीटर समुद्रातील अंतर पार केले आहे. या एकमेव कासवाने सरळ मार्गात समुद्रभ्रमंती सुरु ठेवली आहे. सध्या ती दीव किनारपट्टीपासून ६५ किलोमीटर समुद्रात आहे. प्रथमाने सुरुवातीपासूनच खोल समुद्रकिना-याचा रस्ता धरला.

सॅटलाईट टॅगिंग केलेली दुसरे कासव ‘सावनी’ची मुंबई किना-याला भेट

सॅटलाईट टॅगिंग केलेल्या ‘सावनी’ या मादी ऑलिव्ह रिडले कासवाने गेल्या आठवड्यात नवी मुंबईच्या समुद्रकिना-यापर्यंत प्रवास केला. मात्र ती पुन्हा दक्षिणेकडे परतली. सावनीला गुहागर किनारपट्टीवर सॅटलाईट टॅगिंग केले होते. आतापर्यंत तिने अंदाजे १५० ते २०० किलोमीटर समुद्रभ्रमंती केली आहे. सध्या ती अंजर्ले किनारपट्टीपासून १०० किलोमीटर आत समुद्रात आहे.

सॅटलाईट टॅगिंग केलेल्या चौथ्या ‘वनश्री’ कासवाबाबत

वनश्रीला गुहागर समुद्रकिना-यावर सॅटलाईट टॅगिंग करण्यात आले होते. ती सुरुवातीपासूनच गुहागर समुद्रकिना-याजवळच राहत आहे. सुरुवातीला रत्नागिरी समुद्रकिनारा फिरल्यानंतर सध्या ती सिंधुदुर्ग किनारपट्टीजवळ आहे. आतापर्यंत तिने ७० ते १०० किलोमीटर दक्षिण दिशेकडे प्रवास केला आहे.

सॅटलाईट टॅगिंग केलेल्या पाचव्या ‘रेवा’ कासवाबाबत

रेवा ही मादी ऑलिव्ह रिडले ‘प्रथमा’नंतर सर्वात जास्त समुद्राचे अंतर कापणारी दुसरे कासव ठरले आहे. ती सुरुवातीपासूनच दक्षिणेतील समुद्राकडे प्रयाण करत आहे. रेवाने अंदाजे ३०० किलोमीटर अंतर पार केले आहे. आता ती कर्नाटकातील कारवार शहरापासून ४० किलोमीटर समुद्रात आहे.

सॅटलाईट टॅगिंग तुटलेल्या तिस-या ‘लक्ष्मी’ कासवाबाबत …

पाचपैकी लक्ष्मी या कासवाचा संपर्क तुटून महिना उलटला आहे. ट्रान्समीटरची कमकुवत क्षमता किंवा कासवाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. समुद्रातील अथांगता पाहता लक्ष्मीला शोधणे हे जिकरीचे आहे. मात्र ती पुन्हा सॅटलाईटच्या संपर्कात येईल, ही आशा आहे. मात्र ट्रान्समीटर खराब असावा, असा आमचा अंदाज आहे. अजून महिनाभर लक्ष्मीच्या सॅटलाईट टॅगिंगद्वारे सिग्नल मिळण्याची अपेक्षा आहे. अन्यथा आम्ही हा ट्रान्समीटर बंद करु, अशी माहिती डॉ. राकेश कुमार यांनी दिली.

( हेही वाचा: त्या वाघाच्या मृत्यूचे गूढ उकलले, अन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा झाला हशा )

जाणून घ्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीतील मादी ऑलिव्ह रिडले कासवांमधील फरक

  •  ओरिसा किनारपट्टीला भेट देणा-या मादी ऑलिव्ह रिडले कासव हजारोंच्या संख्येने एकत्र येत किनारपट्टीवर अंडी घालतात.  राज्याच्या पूर्व किनारपट्टीवर पहिल्यांदाच  येणारी ऑलिव्ह रिडले कासवं एकट्याने किनारपट्टीवर येत अंडी घालतात.
  •  ओरिसा किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले सरळ मार्गाने प्रवास करतात. यातील काही कासवं बंगालच्या उपसागरातच राहत होते. कित्येकांनी श्रीलंकेपर्यंत प्रवास केल्याचे अभ्यासाअंती दिसून आले.
  • राज्याच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यातील किनारपट्टीला भेट देणा-या मादी ऑलिव्ह रिडले कासव समुद्रात सरळ मार्गाचा प्रवास करत नाही. तीन कासवांनी सरळ मार्गाने समुद्रभ्रमंती करण्याला फारशी पसंती दिलेली नाही.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार

राज्याच्या किनारपट्टीवर मादी ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट टॅगिंग करणारे भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ सुरेशकुमार यांनीच पश्चिम किनारपट्टीवरील ओरिसा येथील ऑलिव्ह रिडले कासवांचे २००८ साली सॅटलाईट टॅगिंग केले आहे. त्यांच्या अंदाजानुसार राज्यातील सॅटलाईट टॅगिंग केलेली चार मादी ऑलिव्ह रिडले कासवांचा भ्रमंतीमार्ग येत्या काही दिवसांत असा असेल –

  •  राज्याच्या उत्तर दिशेकडे प्रवास झाल्यास ऑलिव्ह रिडले कासव दुबई, ओमान किंवा आफ्रिकेपर्यंत प्रवास करु शकतात.
  •  तीन कासवांनी दक्षिणेकडेच प्रवास करायला पसंती दिली आहे. अरबी समुद्रातून ऑलिव्ह रिडले हिंदी महासागरतरही लक्षद्वीपपर्यंत प्रवास करतील. कदाचित उत्तरेकडे प्रयाण करणारी प्रथमा ही कासवही कालांतराने आपला नजर दक्षिणेकडे वळवेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.