तेलंगणा ते तामिळनाडू दरम्यान हवेच्या वरच्या थरांत पावसासाठी अनुकून द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यात ऐन एप्रिल महिन्यात मेघगर्जनेसह गडगडाटी पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या बुधवारी आणि गुरुवारी पश्चिम आणि दक्षिण कोकणात पावसाच्या सरी बरसणार आहेत.
दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता
ही द्रोणीय स्थिती पुढे सरकत आहे. सध्या ही द्रोणीय स्थिती मराठवाडा ते उत्तर कर्नाटकापर्यंत सरकली आहे. त्याच्या प्रभावाने येत्या चार दिवसांत राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख आणि जी प्रवर्गातील शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी व्यक्त केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूरात दोन दिवस पाऊस मुक्कामी राहील.
दरम्यान, विदर्भाखालोखाल मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तापमानवाढीने जनजीवन त्रस्त आहे. दोन्ही ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत दीड ते तीन अंशाने जास्त आहे. मात्र पावसाच्या आगमनाने तापमानात घट होण्याची शक्यता वेधशाळेच्या अधिका-यांनी व्यक्त केली.