मागच्या दोन वर्षांत कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती. सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. म्हणून सामान्य जनता त्रासली आहे. पण यातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता हळू हळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. सेंटर फाॅर माॅनिटरिंग इंडियन इकाॅनाॅमीच्या अहवालातील माहितीनुसार, या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातील 8.10 टक्क्यांवरुन आता बेरोजगारीचा दर मार्च महिन्यात 7.6 टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. शहरातील बेरोजगारीचा दर सुद्धा 8.5 टक्क्यांवर ग्रामीण बेरोजगारीचा दर हा 7.1 टक्क्यांवर आला आहे.
हरियाणामध्ये सर्वाधिक बेरोजगारी
आकडेवारीनुसार मार्चमध्ये हरियाणात सर्वांत अधिक बेरोजगारी होती. येथे बेरोजगारीचा दर 26.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यानंतर राजस्थान (25 टक्के), जम्मू-काश्मीरचा (25 टक्के) क्रमांक लागतो. बिहारमध्ये बेरोजगारीचा दर मार्चमध्ये 14.4 टक्के होता; तर त्रिपुरामध्ये बेरोजगारीचा दर 14.1 टक्के होता. पश्चिम बंगालमध्ये हा दर 5.6 टक्के होता.
( हेही वाचा: प्रवीण दरेकर रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी रवाना..कधी परतणार? )
कर्नाटक, गुजरातमध्ये बेरोजगारीत घट
एप्रिल २०२१ मध्ये एकूण बेरोजगारीचा दर 7.97 टक्के होता. मागील वर्षी मे मध्ये हा दर 11.84 टक्क्यांच्या उच्च स्तरावर पोहोचला होता. मार्च 2022 मध्ये कर्नाटक (1.8 टक्के) आणि गुजरातमध्ये (1.8 टक्के) बेरोजगारीचा दर सर्वांत कमी होता.