‘मातोश्री’च्या दारी बदनाम हा बाजार; खुलेआम चालतोय देहाचा व्यापार

153

मुंबईत देहविक्रीचा व्यवसाय म्हटले की आपल्यासमोर कामाठीपुरा ‘रेड लाईट एरिया’ येतो. तसे मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून देहविक्री करणाऱ्या महिला आपल्याला पहायला मिळतात. मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात तृतीयपंथीयांनी देहविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. इतके महत्त्वाचे असे हे ठिकाण असूनही खुलेआमपणे येथे हा देहविक्रीचा व्यवसाय चालतो. मात्र तरीही येथे कारवाई होताना दिसत नाही.

येथे रात्री बेरात्री अर्धवट वस्त्रे परिधान करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रस्त्यावर उभे राहून अश्लील हावभाव हे तृतीयपंथी करीत असल्याचे आमच्या प्रतिनिधीच्या निर्दशनात आले आहे. मुंबईतील वांद्रे कलानगर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे मातोश्री हे निवासस्थान आहे. या निवासस्थानाजवळ २४ तास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो आणि याच कलानगरपासून हाकेच्या अंतरावर तृतीयपंथीयांनी देहविक्रीचा आपला अड्डा बनवला आहे. धारावी टी-जंक्शनपासून कलानगर जंक्शन हे अंतर केवळ पाचशे मीटर आहे आणि कलानगर जंक्शन ते मातोश्रीचे अंतर जवळपास १०० मीटर आहे.

( हेही वाचा : पासपोर्ट प्रकरण! एकाच पोलीस ठाण्यातील ७ जणांची बदली  )

देहविक्रीचा अड्डा

या मार्गावर खारफुटीचे जंगल असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिवरांची झाडे आहेत. या तिवरांच्या जंगलाला तृतीयपंथीयांनी देहविक्रीचा अड्डा बनवला आहे. दररोज रात्री ११ नंतर धारावी टी जंक्शन आणि कलानगर जंक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव करताना दिसून येतात. पूर्वेकडून पश्चिमेला जोडणारा हा महत्वाचा मार्ग असून दररोज हजारो वाहने येथून ये-जा करीत असतात. रात्रीच्या वेळी हे तृतीयपंथी वाहनांच्या समोर येऊन अश्लील हावभाव करताना दिसतात. वाहनातून जाणाऱ्या महिलांना हे दृश्य बघून लाजेने मान खाली घालावी लागते.

मुंबईत अनेक ठिकाणी अड्डे

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर जवळ सुरू असलेल्या या देहविक्रीबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी याबाबत तक्रारी देखील केल्या असता पोलिसांकडून एक दिवसासाठी कारवाई केली जाते दुसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे ही परिस्थिती असते. याबाबत धारावी पोलिसांशी संपर्क साधला असता आम्ही नेहमी कारवाई करतो, आमचे पोलीस त्या ठिकाणी गेल्यावर पोलिसांना बघून हे तृतीयपंथी तिवरांच्या झाडीतून पळून जातात अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. हे तृतीयपंथी धारावी, माहीम परिसरात राहणारे असून रात्री ११ नंतर त्यांचा दिवस सुरू होतो व पहाटे ५ वाजेपर्यंत या तृतीयपंथीयांचा या ठिकाणी डेरा असतो.

येणाऱ्या ग्राहकांना झाडीत नेले जाते. तसेच या ठिकाणी पिकअप पॉइंट देखील असून आलिशान मोटारीतून येणारे या तृतीयपंथीयांना सोबत घेऊन जात असतात अशी माहिती हिंदुस्थान पोस्टच्या प्रतिनिधीला काही रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांनी दिली. अनेकवेळा या ठिकाणी ग्राहकांना लुटल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. तृतीयपंथी आणि नशेबाज ग्राहकांमध्ये अनेकवेळा या ठिकाणी पैशांवरून वाद होऊन हे वादाचे रूपांतर हाणामारीत देखील होत असते असे काही टॅक्सी चालकांचे म्हणणे आहे.

मुंबईतील देहविक्रीचा व्यवसाय करणारे तृतीयपंथीय केवळ कलानगर  येथेच नाही तर मुंबईतील अनेक ठिकाणी त्यांनी आपले अड्डे बनवले आहेत. पुढच्या भागात वाचा मुंबईत कुठे कुठे आहेत तृतीयपंथीयांचे देहविक्रीचे अड्डे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.