राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दरमहा 100 कोटींच्या वसूली प्रकरणी सचिन वाझेसह संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या देशमुखांच्या दोन सहाय्यकांना सोमवारी, ४ एप्रिल २०२२ रोजी सीबीआयकडून अटक करण्यात आली. अटकेनंतर या तिघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने या तिघांना सात दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली. त्यामुळे 11 एप्रिलपर्यंत हे तिन्ही आरोपी पुढील चौकशीकरता सीबीआयच्या ताब्यात राहतील.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल देशमुख यांनाही अटक करण्याची न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिलेली आहे. मात्र देशमुख सध्या जेजे रूग्णालयात दाखल असल्याने त्यांची अटक तूर्तास टळली आहे. अनिल देशमुखांच्या चौकशीत राज्य सरकारही सहकार्य करत नाही असा थेट आरोप सीबीआयच्यावतीने न्यायालयात करण्यात आला.
देशमुख अचानक जेजेमध्ये दाखल
तसेच न्यायालयाचा आदेश मिळताच अनिल देशमुखांच्या अचानक रूग्णालयात दाखल होण्यावरही सीबीआयने सवाल उपस्थित केला. अनिल देशमुखांची कस्टडीची न्यायालयाकडून परवानगी गुरूवारी मिळाल्यानंतर आर्थर रोड जेल प्रशासनाने सोमावरी त्यांची कस्टडी देऊ असे सांगितले होते. मात्र सोमवारी जेव्हा सीबीआयचे अधिकारी आर्थर रोड जेलमध्ये गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की अनिल देशमुख बाथरूममध्ये पाय घसरून पडले ज्यात त्यांचा खांदा निखळल्याने त्यांना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुखांशी संबंधित प्रकरणात जवळपास 400 कोटींच्या भ्रष्टाचाराची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. त्यामुळे आरोपींना दिल्लीला घेऊन जाऊन चौकशी करण्याची सीबीआयने न्यायालयाकडे मागणी केली होती. मात्र विशेष न्यायालयचे न्यायाधीश ए.ए. सय्यद यांनी आरोपींना दिल्लीला घेऊन जाऊन चौकशी करण्याची परवानगी नाकारली. तसेच अनिल देशमुखांना अचानक जेजे रुग्णालयात दाखल करण्यासंदर्भात रिपोर्ट मागवण्यासही नकार दिला.
सीबीआयला चौघांचा हवा ताबा
ईडीच्या तपासानंतर आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुढील चौकशीसाठी सीबीआयला अनिल देशमुख, सचिन वाझे , संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा ताबा हवा होता. त्यासाठी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या चारही आरोपींचा ताबा घेण्यासाठी सीबीआयतर्फे मुंबई सत्र न्यायालयात करण्यात अर्ज आला होता.
Join Our WhatsApp Community