गुजरात पाठोपाठ आता ‘या’ राज्यातही शिकवणार ‘श्रीमद् भगवत् गीता’!

156

गुजरात पाठोपाठ आता हिमाचल प्रदेशातही शाळकरी विद्यार्थ्यांना ‘श्रीमद् भगवत् गीता’ शिकवली जाणार आहे. राज्याचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली. त्यानुसार इयत्ता नववी पासून विद्यार्थ्यांना गीतेचे धडे दिले जाण्याची योजना आहे.

(हेही वाचा – करा हो ‘लगीन घाई’… नववर्षात तब्बल ८९ मुहूर्त, बघा यादी)

अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ‘श्रीमद् भगवत् गीता’ समाविष्ट

यासंदर्भात गोविंद ठाकूर यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार इयत्ता नववी पासून सर्व विद्यार्थ्यांना ‘श्रीमद् भगवत् गीता’ शिकवली जाईल. गेल्या 17 मार्च रोजी गुजरातचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी सांगितले होते की, इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ‘श्रीमद् भगवत् गीता’ समाविष्ट केली जाईल. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही शालेय अभ्यासक्रमात भगवत् गीतेचा समावेश करण्याची इच्छा व्यक्त केली.

भारताच्या समृद्ध, वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान

केंद्राच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) धर्तीवर शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेतील नैतिक मूल्ये आणि तत्त्वे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री म्हणाले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान वाटावा यासाठी एनईपी आधुनिक आणि प्राचीन संस्कृती, परंपरा आणि ज्ञान प्रणालीचा समावेश करण्याचे समर्थन करते. यासंदर्भात वाघानी म्हणाले होते की, या प्राचीन हिंदू धर्मग्रंथात नमूद केलेली नैतिक मूल्ये आणि तत्त्वे सर्व धर्मातील लोकांनी स्वीकारली आहेत. त्यामुळे आम्ही सहावी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुस्तकाच्या आधारे प्रार्थना, श्लोक पठण, परिच्छेद, नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला असे उपक्रमही शाळा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तके आणि ऑडिओ-व्हिडिओ सीडी यासारखे अभ्यास साहित्य सरकार शाळांना उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.