देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या बहुचर्चीत समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या काळात पूर्ण झाला आहे. सध्या बुलडाणा आणि वाशिम येथील काम सुरू असून मे अखेरपर्यंत हा महामार्ग नागरिकांसाठी खुला करण्याचा सरकारचा मानस आहे. या महामार्गाचे प्रलंबित काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
यांची उपस्थिती
समृद्धी महामार्गाच्या कामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आढावा घेतला. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते. या महामार्गाच्या दुतर्फा आणि दुभाजकांवर देशी झाडे असावीत तसेच या वृक्षराजीमुळे प्रवास सुखकर व नयनरम्य व्हावा, याविषयी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रातले वैभव
मुंबई आणि नागपूरला जवळ आणणारा समृद्धी हा फक्त एक मार्ग नाही, तर या महामार्गाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक असे वैभव तयार होत आहे, जे सध्या कुठेही नाही. याची किंमत आहे तब्बल ४६ हजार कोटी रुपये. दोन शहरांना एकत्र आणणारा हा महामार्ग मराठवाड्याच्या राजधानीलाही जोडला गेला आहे.
( हेही वाचा: महागाई पाठ सोडेना! पुन्हा पेटले इंधन जाणून घ्या नवे दर )
या जिल्ह्यांतून जातो महामार्ग
नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे. या दहा जिल्ह्यांतून समृद्धी महामार्ग जातो. याशिवाय चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या १४ जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या महामार्गाशी महाराष्ट्रातील एकूण २४ जिल्हे जोडले जातील.
Join Our WhatsApp Community