मुंबई मेट्रोच्या मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 या मार्गिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण न दिल्याने भाजपमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यातच आता समृद्धी महामार्गावरुन देखील भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई रंगली आहे.
समृद्धी महामार्गावरुन माझं नाव कोणीही हटवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत समृद्धी महामार्गावरुन महासंग्राम सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.
(हेही वाचाः फडणवीसांची ‘समृद्धी’ आता ठाकरेंना झाली प्यारी)
काय म्हणाले फडणवीस?
कोणी कितीही प्रयत्न केला तरी समृद्धी महामार्गावरुन माझं नाव हटवता येणार नाही. गेली 20 वर्षे माझ्या या महामार्गाची संकल्पना माझ्या डोक्यात घोळत होती. त्यामुळे जेव्हा जनतेने मला संधी दिली तेव्हा आम्ही ते करू शकलो. त्यामुळे या महामार्गाला ज्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला तेच आता त्याच्या उद्घाटनासाठी प्रयत्न करत आहेत ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘माझ्या आणि राज ठाकरेंच्या भेटीत…’, भाजप-मनसे युतीबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं)
महामार्गाचे स्वागत
समृद्धी महामार्ग सुरू व्हायला हवा. पण त्याची काही कामं अजून पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे घाईघाईत त्याचं उद्घाटन केल्याने त्याचे महत्व कमी होईल. त्यामुळे ही कामं पूर्ण करावीत, या महामार्गाचं कधीही उद्घाटन झालं तरी आम्ही त्याचं स्वागत करू, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.
समृद्धीवरुन किती बरबादी होणार?
मुंबई मेट्रोच्या श्रेयाचे खरे मानकरी हे देवेंद्र फडणवीस असून, त्यांना मेट्रोच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण देण्यात आले नाही. तसेच ज्या शिवसेनेने आधी समृद्धी महामार्गाला जोरदार विरोध केला, त्यांनाच आता या महामार्गाचे मानकरी व्हायचे आहे. पण त्यांनी कितीही कल्ला केला तरी या महामार्गाचे खरे मानकरी हे केवळ देवेंद्र फडणवीस आहे आणि राज्यातील जनता याची साक्षीदार आहे, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील श्रेयवादाचा हा वाद आता आणखी चिघळणार का, समृद्धी वरुन हे दोन्ही पक्ष एकमेकांची किती बरबादी करणार? याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
(हेही वाचाः महाराष्ट्रामध्ये बेवड्यांचं सरकार आलं आहे, फडणवीसांचा गंभीर आरोप)
Join Our WhatsApp Community