आपलं पिक चांगलं यावे यासाठी शेतकरी अहोरात्र घाम गाळत असतो. नांगरणी केल्याशिवाय पिकं बहरत नाही, परंतु नांगरणीशिवाय शेती शक्य आहे, असं कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही अतिश्योक्ती वाटत असली तरीही ते खरं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील धामणवन येथील संतोष बारामते या शेतकऱ्याने पाच वर्षांपासून शेती नांगरलीच नाही. असे असतानाही त्या शेतकऱ्याने भरघोस पिक घेतले आहे. कारण गांडुळच त्यांच्या शेतीची मशागत करतात, जमीन भुसभुशीत करतात. या भुसभुशीत जमिनीत नांगरणीशिवाय अनेक पिके जोमाने येत असल्याचे समोर आले आहे.
गांडुळांची संख्या वाढली आणि बीजही झाले तयार
धामणवन हे अत्यंत दुर्गम डोंगराळ गाव. या परिसरात सिंचनाची सोय नाही. संतोष व सुमन बारामते यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रावर सिंचनासाठी शेततळे बांधले. या पाण्यावर ते सेंद्रिय पद्धतीने पिके घेतात. मशागतीसाठी एकरी वीस हजार रुपये खर्च येतो. त्यावर ते उपाय शोधू लागले. कृषी सहाय्यक भगवान वाकचौरे यांनी गांडूळ शेतीची माहिती दिली. २०१७ ला अकोले येथून गांडूळ बीज आणून प्लास्टिक पिंपांमध्ये चार महिने वाढविले. गांडुळांची संख्या पाचपट झाली व गांडूळ बीजही घरी तयार झाले.
(हेही वाचा – देशमुखांच्या खांद्याचे दुखणे जुनेच)
खर्च कमी व उत्पादन दुपटीने वाढले
जमिनीत तीन-चार इंचावर उन्हाळ्यात, तर एक इंचावर पावसाळ्यात गांडुळ आपले अन्न व पिढ्या तयार करतात. कुजलेले कार्बनी पदार्थ व पिकांचे वाळलेले अवयव यावर ते जगतात. जमीन भुसभुशीत करतात तसेच परिपूर्ण सेंद्रिय खत तयार करतात. त्यातून खर्च कमी व उत्पादन दुपटीने वाढल्याचे शेतकरी संतोष बारामते यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community