दुकानांचे नामफलक हे मराठी भाषेतून लावण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक हे मराठी भाषेतून लावण्याचे निर्देश महापालिका शिक्षण विभागाने बजावले आहे. महापालिका मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळांनी दर्शनी भागात शाळेच्या नावाचे नामफलक हे मराठी भाषेत लावणे आणि शाळा महापालिका मान्यताप्राप्त असेल तर ‘बृहन्मुंबई महानगरपालिका मान्यताप्राप्त शाळा’ असा नामफलक मराठी भाषेत लावण्याचे निर्देश सर्व भाषिक मनपा मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांचे सचिव तसेच मुख्याध्यापकांना दिले आहेत.
( हेही वाचा : माहिम एल.जे. रोडवर अनधिकृत डेब्रीज : तिसऱ्यांदा टाकला गेला या भागात दगडविटांचा राडारोडा )
मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना
बृहन्मुंबई महापालिका शिक्षण विभागाने शाळांचे नामफलक मराठीतून लावण्यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकामध्ये यापूर्वी मुंबई महापालिका मान्यताप्राप्त शाळा मंजुरी क्रमांकासह सुयोग्य आकाराचा फलक दर्शनी भागात लावण्याबाबत सूचित करण्यात आले होते. या संदर्भात शासनाच्या निर्णयानुसार वेळोवेळी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचनेनुसार शाळांमध्ये लावण्यात आलेले फलक हे मराठी देवनागरी लिपित असणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन तथा मुख्याध्यापक यांनी यासंदर्भात कार्यवाही करावी असे त्यांनी म्हटले आहे.
महापालिका शिक्षण विभगाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट करताना सर्व प्राथमिक शाळांमध्ये मराठीतून नामफलक लावले जावे तसेच अनुदान तथा मान्यताप्राप्त शाळा असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिका मान्यताप्राप्त शाळा असेही फलक मराठीतून लावले जावे, असे या निर्देशात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community