ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अटकेची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. पण राऊतांवर झालेल्या या कारवाईनंतर राज ठाकरे यांनी राऊतांबाबत वर्तवलेली भविष्यवाणी खरी होणार का, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात संजय राऊत यांची नक्कल करत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी आमचे राज्य हे मिमिक्रीवर चालत नसल्याचे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला होता. राऊतांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना, ‘त्यांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी’, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. राज ठाकरेंच्या या विधानावरुन त्यावेळी चांगलीच खळबळ उडाली होती. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर एका महिन्याच्या आत राऊतांवर झालेल्या या कारवाईमुळे राज ठाकरे यांची भविष्यवाणी खरी होऊन राऊतांना तुरुंगात जावं लागणार का, अशा चर्चा आता चांगल्याच रंगल्या आहेत.
(हेही वाचाः संजय राऊतांकडे किती आहे संपत्ती? जाणून घ्या…)
राऊतांचा भोंगा आता आर्थर रोडमध्ये वाजणार
राऊतांवर झालेल्या या कारवाईनंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील राऊतांच्या अटकेची शक्यता वर्तवली आहे. जेव्हा संजय राऊत यांनी आधी बडबड केली होती तेव्हाच संजय राऊत यांनी भिंतींशी बोलायची प्रॅक्टिस करावी, असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. ती वेळ आता जवळ येऊन ठेपलेली आहे. आज राऊतांची मालमत्ता जप्त झाली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना राऊतांचा जो सकाळचा 9चा भोंगा ऐकायची सवय झाली आहे, तो भोंगा आता आर्थर रोडमधून ऐकायला लागेल, असं सूचक विधान संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
(हेही वाचाः राऊतांनाही देशमुख आणि मलिकांच्या पंगतीत शिवभोजन जेवायला बसवावं, राणेंचा टोला)
Join Our WhatsApp Community