दोन वर्षे कोरोना काळात लॉकडाऊन होता. त्यामुळे सभा, संमेलने झाली नाही. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर जाहीर सभा घेतली. ‘२ वर्षे मोरी तुंबली, कुठून बोळा काढायचा असा प्रश्न पडला आहे, जितके शक्य आहे, तितके कमी करतो’, अशा शेलक्या शब्दांत भाषणाची सुरुवात करत राज ठाकरे यांनी विविध विषयांना हात घातला. त्यामुळे साहजिकच त्यानंतर तीन दिवस महराष्ट्राच्या राजकारणात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज ठाकरे यांच्यावर आरोपांची लाखोली वाहिली जात आहे. म्हणून आता राज यांनी पुन्हा एकदा याचा समाचार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ९ एप्रिल तारीख ठरली आहे.
भोंग्याच्या मुद्यावर पुढील दिशादर्शन
राज ठाकरे यांनी कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत थेट मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली, अन्यथा हनुमान चालीसा लावली जाईल, असा इशारा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील काही भागात भोंग्यांवर हनुमान चालीसा ऐकू येऊ लागली. राज यांच्या या सभेनंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चौफेर हल्ला चढवला. या भूमिकेवर मनसेतील मुस्लीम पदाधिकाऱ्यांनीच नाराजी व्यक्त केली. पुण्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले. तर पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून राजकीय अडचण होत असल्याचे म्हटले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे आरोप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ९ एप्रिलला ठाण्यात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा राष्ट्रवादीच्या रोहितला गडकरींचे आश्वासन…तू बिंधास्त जा, तुझे काम झाले समज!)
राष्ट्रवादीवरील आरोपावर पुरावे देणार?
ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या समोरील रोडवर ही सभा होणार असून यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सभेसंदर्भात सूचना दिल्या आहेत. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट जातीयवादाचे आरोप केले होते. राज ठाकरेंच्या भाषणानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने टीका सुरू ठेवली. राज ठाकरे यांनी मदरशांमध्ये छापा टाका, असे म्हटले. त्यावर आव्हाड यांनी मुंब्र्यातील वस्तारा जरी सापडला, तरी आपण राजकारण सोडून देऊ, असे आव्हान दिले. त्यामुळे या सभेत राजा ठाकरे राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांवर काय पुरावे देणार हेही पाहावे लागणार आहे.
Join Our WhatsApp Community