कोविड काळात आरोग्य खात्याकडे बारीक लक्ष असलेल्या मुंबई महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आता या विभागाकडील लक्ष कमी होताना दिसत आहे. कोविड काळात सर्व प्रकारची आरोग्य विषयक बाबींची उपलब्धता त्वरीत करून देणाऱ्या महापालिका प्रशासनाचे आता रुग्णालयांसह प्रसुतीगृहे व दवाखान्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याठिकाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या कापसासहित सर्जिकल ड्रेसिंगच्या कंत्राटाचा कालावधी कोविड काळात संपुष्टात आल्यानंतरही आजही याची खरेदी रखडली आहे. या बाबतचा प्रस्ताव १८ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीपुढे मंजुरीला ठेवण्यात आल्यानंतर सत्ताधारी पक्षाने आणि प्रशासनानेही याला मंजुरी दिली नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाच सर्जिकल ड्रेसिंगचे साहित्य बाहेरुन आणून द्यावे लागत असून, प्रशासकाच्या आवश्यक बाबींमध्ये या आरोग्य विषयक वस्तूंचा समावेश नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
म्हणून निविदा रखडली
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह प्रसुतीगृह तसेच दवाखाने आदी ठिकाणी सर्जिकल ड्रेसिंगचे साहित्य हे महत्वाचे असून कोविडपूर्वी याचे कंत्राट संपुष्टात आले. त्यामुळे नव्याने कंत्राटदाराची नेमणूक करून या साहित्याचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. परंतु पुढे मार्च २०२० रोजी कोविडचा संसर्गामुळे निर्माण साथीच्या आजारामुळे निविदा रखडली. पण त्यानंतर कोविडची लाट कमी झाल्यानंतर निविदा प्रक्रियेची कार्यवाही करून रुग्णालय, प्रसुतीगृह व दवाखान्यांमध्ये स्थानिक पातळीवर खरेदीचे अधिकार देण्यात आले होते. त्यातून सर्जिकल ड्रेसिंगचे साहित्य तात्पुरते खरेदी करून पुरवले जात होते.
सर्जिकल ड्रेसिंगचा प्रचंड तुडवडा
परंतु याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागील १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सन २०२१-२३च्या औषध अनुसूची क्रमांक ७ अन्वये सर्व महापालिका रुग्णालये, प्रसुतीगृहे, दवाखाने इत्यादींना सर्जिकल ड्रेसिंगचा पुरवठा करण्याच्या कामासाठी मागवलेल्या कंत्राटाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता. परंतु त्यानंतर झालेल्या चार समितीच्या बैठकांमध्ये हा प्रस्ताव विचारातच घेतला नाही आणि शेवटच्या ७ मार्च रोजीच्या सभेतही यावर निर्णय घेण्यात न आल्याने हा प्रस्ताव प्रशासकाच्या मंजुरीसाठी मागील महिन्यापासून प्रलंबित आहे. रुग्णालयांमध्ये सर्जिकल ड्रेसिंगचा प्रचंड तुडवडा असून अखेर डॉक्टर मंडळीही रुग्णांच्या नातेवाईकांना हे साहित्य बाहेरुन आणण्यास भाग पाडत आहेत.
( हेही वाचा: मालाड पश्चिममधील वाल्मिकी मंदिराच्या सभोवतालचा पुराचा वेढा कमी होणार )
सरकार आणि प्रशासकांचेही दुर्लक्ष
एका बाजुला सर्जिकल ड्रेसिंगचा प्रस्ताव प्रलंबित आहेत. शिवाय कोविड काळात ज्या लिक्विड ऑक्सिजनसाठी धावाधाव झाली होती, त्या महापालिका रुग्णालये, जंबो कोविड सेंटरमध्ये आरोग्य सेवकांच्या वापरासाठी असलेल्या लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या प्रस्तावावरही कोणताही निर्णय प्रशासक घेत नाही. रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणारा हॅण्ड सॅनिटायझरचा पुरवठाही प्रशासकाच्या मंजुरी अभावी रखडला आहे. सत्ताधारी पक्षाने आपल्या सोयीचे प्रस्ताव मंजूर करताना आरोग्य विषयक साहित्याच्या पुरवठ्याच्या खरेदीकडे दुर्लक्ष केलेच,आता प्रशासकही दुर्लक्ष करत असल्याने हे साहित्य रुग्णांना कशाप्रकारे उपलब्ध करून द्यायचा असा प्रश्न रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आदींना पडला आहे.
Join Our WhatsApp Community