गेल्या पाच महिन्यांपासून एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मंगळवारी सुनावणी असल्याने, दहा हजारांहून अधिक कर्मचारी आझाद मैदानात आले होते. मात्र, एसटी महामंडळाने उच्च न्यायालयात आपली याचिका मागे घेण्याची तयारी दाखवल्याने आता एसटी कर्मचा-यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या एसटी महामंडळाच्या ५१ संपकरी कर्मचाऱ्यांची तब्येत खालावल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या तीन दिवसांत १०० कर्मचारी रुग्णालयात
मिळालेल्या माहितीनुसार, या ५१ संपकरी कर्मचाऱ्यांची तब्येत खालावल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे कर्मचारी साखळी उपोषण करीत आहेत. पोलिसांच्या उपस्थितीत रोज सकाळी मैदानातील रुग्णवाहिकेतील डॉक्टरांकडून संपकरी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान काही कर्मचाऱ्यांना मंगळवारी वाढलेला उष्मा आणि उपोषणामुळे चक्कर येणे, बेशुद्ध होणे, रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांत १०० संपकरी कर्मचाऱ्यांना आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी होणार पुन्हा सुनावणी
राज्य सरकारने एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही म्हटले आहे. पण सातवा वेतन आयोग किंवा आणखी पगारवाढ देऊन कारवाई मागे घेतल्यास कर्मचारी कामावर रुजू होतील, असे संपकरी कर्मचा-याने म्हटले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे, पण अजूनही न्याय मिळाला नाही. एसटीने संप खटला मागे घेण्याची मागणी उच्च न्यायालयाने केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही अनेक महिन्यांपासून संप सुरू आहे. आमच्या अवमान याचिकेत अर्थ उरला नाही, त्यामुळे ती मागे घेऊ द्यावी, अशी विनंती महामंडळाच्या वकिलांनी केली आहे. यावर बुधवारी सुनावणी होणार आहे.
( हेही वाचा: महागाईचा भडका! आता PNG-CNG च्या दरांतही मोठी वाढ )