पोषण पंधरवडा अभियान: राज्यात ‘या’ जिल्ह्याने पटकावला पहिला क्रमांक!

188

देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारतर्फे २१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडा अभियान राबविण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. रायगड जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची संख्या व लोकसहभाग या दोन्हीही प्रकारात रायगड जिल्ह्याने हे यश मिळविलेले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली आहे.

(हेही वाचा – एसटी महामंडळाचे ५१ संपकरी कर्मचारी रूग्णालयात दाखल)

२१ मार्च ते ४ एप्रिलमध्ये पोषण पंधरवडा अभियानि

माता आणि बालके सदृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पोषण पंधरवडा अभियान २१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात २१ मार्च २०२२ ते २७ मार्च दरम्यान रायगड जिल्हयातील ० ते ६ वयोगटातील बालकांची वजन व उंची पोषण ट्रॅकर अॅपमध्ये नोंद करण्यात आली. तसेच २८ मार्च २०२२ ते ४ एप्रिल २०२२ पर्यंत गावपातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पालक मेळावा, माता बैठका, प्रभात फेरी, पोषण रॅली, स्वच्छता मोहिम कार्यक्रम, ऑनलाईन वेबिनार, सायकल रॅली, लसीकरण, किशोरवयीन मुलींचे HB तपासणी कार्यक्रम, सुपोषण दिवस, बालकांच्या १००० दिवसांबाबत जनजागृतीपर कार्यक्रम तसेच गृहभेटी अशा विविध उपक्रमांवर रायगड जिल्हयामध्ये भर देवून पोषण उपक्रम व लोकसहभाग या दोन्ही वर्गवारीमध्ये रायगड जिल्हयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

रायगड जिल्ह्याने पटकाविला प्रथम क्रमांक

पोषण पंधरवडा अंतर्गत जिल्ह्यातील १७ प्रकल्पांमध्ये ३७ लाख उपक्रम राबवित राज्यात उपक्रमांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाल्याने राज्यात लोकसहभागातही रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पोषण महा उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मेहनत घेतली. पोषण पंधरवडा अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. महिनाभरात जिल्ह्यात ३७ उपक्रम राबवित राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत या उपक्रमासाठी लोकसहभाग लाभल्याने, लोकसहभागात रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य देशात पुन्हा एकदा प्रथम

‘सुपोषित भारत’ या संकल्पनेखाली आता पोषणाची चळवळ सर्वत्र पसरू लागली आहे. या चळवळीत महाराष्ट्राने सातत्याने अग्रेसर रहात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. नुकत्याच झालेल्या पोषण पंधरवड्यात महाराष्ट्र राज्याने देशात पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची संख्या व सहभागी लाभार्थींची संख्या या दोन्हीही प्रकारात महाराष्ट्राने हे यश मिळविले आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमांच्या संख्येत गुजरात आणि उत्तर प्रदेशला तर लाभार्थींच्या संख्येतही कर्नाटक आणि गुजरातला मागे टाकले आहे. महिला व बाल विकास विभागाच्यावतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम, अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांनी घेतलेली मेहनत या सर्वांचा हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.