शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राज्यसभा सदस्य आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांची दोन घरे आणि अर्धा एकर जमीन ईडीने ताब्यात घेतली. हे केवळ पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घातले आहे. त्यावर मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी मी अपेक्षा केली नव्हती. हा विषय त्यांच्या कानावर घातला इतकेच, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.
मागील दीड वर्षांपासून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राज्यपाल मंजूर करत नाही. राज्यपाल कार्य तत्पर दिसत नाहीत. हे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवले आहे. त्यावरही पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी अपेक्षा केली नव्हती, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा दिल्लीत खलबतं! पवारांनी घेतली मोदींची भेट, कोणत्या विषयावर झाली चर्चा?)
राऊतांवर कारवाईची गरज नव्हती
संजय राऊत भाजपच्या विरोधात टीका करतात, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे. राऊत यांच्यावर कारवाई करण्याची गरज नव्हती. जर केंद्रीय तपास यंत्रणा ही कारवाई करते, तर त्याची जबाबदारी या यंत्रणांनीच घ्यायची आहे, असे सांगत महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, त्यातील एकही पक्ष नाराज असेल तर सरकार चालणार नाही, म्हणून आम्ही सर्वजण एकमेकांना सांभाळत असतो. काँग्रेस नाराज आहे, हे फक्त वर्तमानपत्रात समजले, प्रत्यक्षात काँग्रेस नाराज नाही, असेही शरद पवार म्हणाले. मी युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयार नाही, अशी भूमिका मी याआधीच स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नेत्यांची इच्छा आहे, पण माझी इच्छा नाही, असेही पवार म्हणाले.
२०१९ मध्ये राज ठाकरे भाजपविरोधात होते
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. अडीच वर्षांनंतर पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा पुन्हा आमची सत्ता येईल, असेही पवार म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहीही बदल होणार नाही. सरकारमधील माझ्या पक्षाविषयी मी सांगतो याच्या मंत्र्यांमध्ये काही बदल होणारे नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. २०१९ यामध्ये राज ठाकरे भाजपच्या विरोधात होते, तेव्हा ते दोन्ही काँग्रेसला मते या पण भाजपाला देऊ नका, असे म्हणाले होते. आता त्यांच्या भूमिकेत बदल का झाला हे मला माहित नाही. राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांविषयी जे बोलले त्याला भाजपने पाठिंबा दिला. भाजपशासित राज्यांमध्ये त्यावर अंमलबजावणी का होत नाही, अशी विचारणा पवार यांनी केली.
(हेही वाचा मोदी-पवार भेटीमुळे राजकारणात तर्कवितर्कांना उधाण)
Join Our WhatsApp Community