घोरपडीवर बलात्कार करणा-या विकृत शिका-याला अटक

187

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गोठणे येथील गाभा क्षेत्रात शस्त्रास्त्रांसह फिरणा-या तीन शिका-यांच्या वन विभागाने गेल्या आठवड्यात मुसक्या आवळल्या. हे तिन्ही शिकारी नजीकच्या भागांतील गावकरी आहेत. मात्र चौकशीअंती या तीन आरोपींपैकी एका आरोपीने चक्क घोरपडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती वनाधिका-यांना मिळाली. घोरपडीसारख्या साडेचार फूटांच्या प्राण्यासोबत संभोग करण्याचे घृणास्पद कृत्य करणा-याला आता वनविभाग मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्याची तयारी करत आहे. ही घटना वन गुन्ह्यातील अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे.

काय आहे प्रकरण

व्याघ्र गणनेसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लावलेल्या ट्रेप कॅमे-यात ३१ मार्च रोजी शस्त्रांस्त्रासह तीन आरोपी जंगलात जात असल्याचे वनाधिका-यांनी पाहिले. मात्र शिकारी निसटल्याने चांदोली येथे वनाधिका-यांचे तपास पथक तयार झाले. गुप्त माहितीच्या आधारे एका आरोपीला हातिव गावातून तर दोन आरोपींना रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथून ताब्यात घेण्यात आले. या चौकशीत शिका-यांकडून दोन बदुंकी तसेच दोन दुचाकीही वनाधिका-यांनी जप्त केल्या. त्यावेळी तिन्ही आरोपींचे मोबाईल तपासल्यानंतर एका आरोपीने चक्क घोरपडीसोबतच संभोग केल्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ वनाधिका-यांच्या हाती लागला आहे. संभोग करताना आरोपीच्या मोबाईलमधून त्याचे चित्रीकरणही केले जात होते. ती घोरपड या घृणास्पद कृत्यानंतर जिवंत राहिली का, आरोपीने इतर कोणत्या वन्यप्राण्यासोबत संभोग केला आहे का, याबाबतची चौकशी सुरु असल्याची माहिती चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली. या तिन्ही शिका-यांना मिळालेली वनकोठडी ७ एप्रिल रोजी संपत आहे. परंतु चौकशीसाठी अजूनही वाव असल्याने वनाधिका-यांची टीम हा मुद्दा न्यायालयासमोर मांडणार आहे.

वन्यप्राण्यासोबत संभोग करणे ही फारच विचित्र घटना आहे. ही केस मांडताना सर्व कायदेशीर बाजू न्यायालयासमोर सादर केल्या जातील. यासाठी कायदेतज्ज्ञांची मदत घेतली जाईल.
– विशाल माळी, (विभागीय वनाधिकारी, चांदोली राष्ट्रीय उद्यान)

शिका-यांनी शिकार केलेल्या प्राण्यांचेही मोबाईलमध्ये रॅकॉर्डिंग केले. तसेच शिकार केलेल्या ससा, पॅंगोलिन, साळिंदर, पिसुरी हरिण यांचे फोटोही त्यांच्या मोबाईलमध्ये सापडले.

सात वर्षे तुरुंगवासाची तरतूद

देशातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्यांना विविध वर्गवारीत संरक्षण दिले जाते. वाघ आणि सिंहाप्रमाणेच घोरपड ही वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत पहिल्या वर्गवारील संरक्षित आहे. त्यामुळे घोरपडीची शिकार किंवा अवैधरित्या तस्करी करणा-याला सात वर्षे सक्त तुरुंगवासाची तरतूद या कायद्यांतर्गत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.